मंदिरासह पाच घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:53 PM2017-12-03T23:53:46+5:302017-12-03T23:56:25+5:30
परतवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धोतरखेडा येथे चोरट्यांनी शनिवारी रात्रभर धुमाकूळ घातला.
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : परतवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धोतरखेडा येथे चोरट्यांनी शनिवारी रात्रभर धुमाकूळ घातला. दत्त मंदिरासह पाच घरांचे कुलूप फोडले. रोख रकमेसह हजारोंचा मुद्देमाल घेऊन पसार झालेत.
परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेडा येथील श्री दत्त मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडल्यानंतर चोरट्यांचा मोर्चा पंजाबराव पटारे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घरातील साहित्याची नासधूस करीत ५० किलो वजनाचा गव्हाचा कट्टा, महिलांच्या बॅग घेऊन पळ काढला. पुढे पंजाबराव भोंडे यांच्या घरात प्रवेश करताच भोंडे परिवारातील सदस्य जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या चेहºयावर टॉर्चने प्रकाश करताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर साहेबराव दोनाडकर यांच्या घरात शिरले. रोख दोन हजार रूपयांसह घरातील साहित्य पळविले, चोरट्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम व दागिने न सापडल्याने त्यांचा मोर्चा एकामागून एक घराकडे सुरूच असताना मंगल्या राजने यांच्या घरात प्रवेश करून रोख १५ हजार रूपये घेऊन तिन्ही चोरट्यांनी पोबारा केला.
शस्त्राच्या धाकावर घरमालक ओलीस
चोरट्याजवळ खंजीर, लोखंडी वाद्यांसारखी धारदार शस्त्रे असल्याने त्यांचा पाठलाग करण्याचे धैर्य दाखविले नाही. ज्ञानेश्वरराव पटारे यांच्या घरात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी सर्व खोल्यांच्या दारांच्या कडी लावून त्यांना ओलीस ठेवले व नासधूस केली. नजीकच्या सावळी, पांढरी, कांडली येथे चोरीच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे.
शेतात झाली ओली पार्टी, मंदिरातील फुलोरा फस्त
धोतरखेड्यात प्रवेश करण्यापूर्वी गाव-शिवारावरील एका शेतात चोरट्यांची ओली पार्टी रंगली. पोलिसांनी तपासणी केली असता तेथे दारूच्या बाटल्या व खाद्यपदार्थाचे साहित्य आढळून आले. त्यामुळे मध्यरात्री गावात शिरण्यापूर्वी चोरट्यांनी शेतात आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले. दारूच्या बाटल्या, शर्ट, ब्लँकेट सापडले असून दत्त मंदिरात रविवारची दत्त जयंती असल्याने पंचपक्वान्नांचा लावलेला फुलोरासुद्धा चोरट्यांनी फस्त केला.
चोरटे खुदकन हसले
शनिवारी मध्यरात्री दीड ते साडेतीन वाजेपर्यंत दत्त मंदिरासह पाच घरांच्या दाराचे कुलूप फोडून साहित्यासह हजारो रूपयांची रोख पळविणाºया चोरट्यांनी पंजाबराव भोंडे यांच्या घरात प्रवेश करताच आवाजामुळे भोंडे परिवारातील काही सदस्य जागे झाले. त्यांनी या तिघांच्या चेहºयावर बॅटरीचा प्रकाश टाकला. तीनपैकी दोघे यामुळे खुदकन हसले. त्यांचे चेहरे भोंडे यांच्या स्मरणात असून परतवाडा पोलिसांनी रविवारी त्यांच्याकडे असलेली चोरट्यांची छायाचित्रे दाखविली. मात्र त्यात रात्रीच्या चोरट्यांचे चेहरे दिसत नसल्याचे स्पष्ट केले.
धोतरखेडा येथे चोरीचा तपास आरंभला असून परतवाडा नजीकच्या परिसरात गस्त वाढविल्यावर त्यांनी ग्रामीण भागात मोर्चा वळविला आहे. नागरिकांनासुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- संजय सोळंके,
ठाणेदार, परतवाडा