पाच जेसीबी, हत्ती, ट्रॅक्टरने चुनखडीतील पिके नष्ट

By admin | Published: July 12, 2017 12:06 AM2017-07-12T00:06:19+5:302017-07-12T00:06:19+5:30

व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चुनखडी येथे पाच जेसीबी, चार ट्रॅक्टर व हत्ती फिरवून आदिवासींची पिके नष्ट केली.

Five JCBs, elephants, tractors destroyed the limestone crops | पाच जेसीबी, हत्ती, ट्रॅक्टरने चुनखडीतील पिके नष्ट

पाच जेसीबी, हत्ती, ट्रॅक्टरने चुनखडीतील पिके नष्ट

Next

लोकप्रतिनिधींना बंदी : आदिवासी शेतकऱ्यांना ठेवले ओलीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चुनखडी येथे पाच जेसीबी, चार ट्रॅक्टर व हत्ती फिरवून आदिवासींची पिके नष्ट केली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून आदिवासींना दिवसभर चक्क ओलीस ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींना देखील गावांत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. प्रशासनाच्या हुकुमशाहीविरूद्ध मेळघाटात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. हाप्रकार मंगळवारी सकाळी ६ पासून सुरू झाला.
प्रशासनाने चालविलेल्या याप्रकाराविरूद्ध आता ठोस भूमिका घेऊन जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन मेळघाटचे आ.प्रभुदास भिलावेकर यांनी केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील चुनखडी येथे मंगळवारी पहाटे सहा वाजतापासून व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे दोन प्लॅटून, वनकर्मचारी, ठाणेदार, सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो यांच्यासह दीडशे कर्मचाऱ्यांचा ताफा पाच जेसीबी, चार ट्रॅक्टर, हत्तींसह पोहोचला. लगेच येथील गाणू टेलर, सोनाजी बेठेकर, रामू बेठे, पुना कास्देकर आदी आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट करण्यात आले.
चुनखडी गावशिवारामध्ये पोलिसांचा ताफा थांबवून ठेवण्यात आला होता. अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसह गावाला ओलीस ठेवण्यात आले. सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो यांनी अर्धा किलोमीटर अंतरापासून प्रवेशबंदी केल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोलू मुंडे यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर या कारवाईची छायाचित्रे काढण्यासही मज्जाव करण्यात आला.
नायब तहसीलदारांसह वनाधिकारी, पोलीस नजरकैदेत
चुनखडी गावात कारवाई करण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह, वनसंरक्षक, वनाधिकारी व ७० वनकर्मचारी आणि २५ पोलिसांना गावकऱ्यांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठांना संदेश दिल्यावरून चिखलदरा, परतवाडा व धारणी येथून अतिरिक्त कुमक चुनखडी गावात पाठविण्यात येणार असल्याची माहिती उशिरा रात्री मिळाली.
अतिक्रमित शेतकऱ्यांना पीक काढणीपर्यंतचा अवधी देण्याचा शब्द प्रशासनाने पाळला नाही. याबाबत वनमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे आ.प्रभुदास भिलावेकरांनी सांगितले.

महिलांचा टाहो
कष्टाने पेरलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट केले जात असल्याचे पाहून आदिवासी महिलांनी मुलाबाळांसह टाहो फोडला. किमान पीक निघू द्या, अशी विनवणी केली. मुलाबाळांसह त्यांचे आक्रंदन हृदय हेलावणारे होते. मात्र, संवेदनशून्य अधिकाऱ्यांना त्यांची दया आली नाही.

वनमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन
आ. भिलावेकर यांनी मागील आठवड्यात वनराज्यमंत्री अंबरिश आत्राम, वनसचिव विकास खारगे यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली होती.त्यामुळे तूर्तास कारवाई थांबविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले होते. मात्र, वनमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी उभे पीक तुडवून आदिवासींना जेरीस आणले

Web Title: Five JCBs, elephants, tractors destroyed the limestone crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.