टग्यांची रोडरोमियोगिरी; चिठठीतून कॉल करण्याचा संदेश, शालेय स्नेहसंमेलनात घातला धुडगुस
By प्रदीप भाकरे | Published: January 27, 2023 04:51 PM2023-01-27T16:51:36+5:302023-01-27T16:56:16+5:30
विनयभंग, रहिमापूर पोलीस ठाण्यात नोंदविला गुन्हा
अमरावती : कोवळ्या वयातील मुली, विद्यार्थिनी तरूणांकडून लक्ष्य केल्या जात आहेत. त्यातून त्यांच्या छेडखानीच्या, विनयभंगाच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागामध्ये पाच अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असाच एक वनसाईड अट्रॅक्शन व शहरी रोडरोमियोंच्या घातलेल्या हैदोसाचा प्रकार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका शाळेतील स्नेहसंमेलनादरम्यान घडला. एका अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देऊन त्यातून फोन कॉल करण्याचा संदेश देत तिची छेड काढण्यात आली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
सय्यद जुनेद सय्यद अहमद (२१, रा. अंजनगाव तहसीलजवळ), शेख रेहान शेख हाफिज (२०, रा. नवगाजी प्लॉट, अंजनगाव सुर्जी) व पप्पू खान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दोघांना अटक करण्यात आली असून, पप्पू खान हा फरार झाला आहे. १५ वर्षीय विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावातील शाळेमध्ये २३ जानेवारीपासून स्नेह संमेलन होते. त्यामुळे तेथील विद्यार्थीनी असलेली ती मुलगी मैत्रिणींसह नृत्य बघत असतांना तेथे तीन आरोपी मुले आले. त्या दोन्ही मुलींकडे एकटक बघत, त्यांनी छेड काढली.त्यानंतर तालुकास्थळाचे रहिवासी असलेले ते तिघे रोज त्या मुलीच्या शाळेत येऊ लागले. पिडिताकडे बघून अश्लिल इशारे करत होते.
अशी घडली घटना
२६ जानेवारी रोजी १५ वर्षीय मुलगी शाळेतील ध्वजारोहन कार्यक्रमानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास मैत्रिणीसह क्रिडांगणावर बसली असता, एक मुलगा तेथे आला. त्याने मुलीच्या हातात एक चिट्ठी दिली. रस्त्याकडे हात दाखवून ती चिठ्ठी त्या दादांनी दिली. त्यातील नंबरवर फोन करण्यास सांगितल्याचा निरोप त्याने दिला. मुलीने ती चिट्ठी फाडली. दरम्यान त्या तीन मुलांकडे तिने कटाक्ष रोखला असता, ती मुले तीच असल्याचे तिच्या लक्षात आले. आम्हाला तुमच्याशी प्रेम, मैत्री करायची आहे, आमच्यासोबत येता का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे घाबरून त्या दोघी तेथून निघून गेल्या. त्या तिघांनी त्यांचा पाठलाग केला. घरी गेल्यानंतर ही बाब त्यांनी कुटुंबियांना सांगितली. तर काही तरूणांनी तीनही आरोपींची ओळख पटविली. पोलिसांनी लगेचच दोघांना ताब्यात घेतले.