अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे ठरली, स्थानिक एकही पात्र नाही
By गणेश वासनिक | Published: January 15, 2024 06:34 PM2024-01-15T18:34:52+5:302024-01-15T18:35:51+5:30
डॉ. मिलिंद बाराहाते, ए. एम. महाजन, वाणी लातूरकर, रामचंद्र मंठाळकर आणि राजेश गच्चे यांचा समावेश
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूपदासाठी ‘शॉर्ट लिस्ट’नुसार ४३ उमेदवारांपैकी अंतिम पाच नावे निश्चित करण्यात आली आहे. या पात्र पाच उमेदवारांना राजभवनातून २० जानेवारी रोजी होऊ घातलेल्या मुलाखतीसाठी शनिवारी ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
यात मिलिंद बाराहाते (नागपूर), ए. एम. महाजन (नांदेड), रामचंद्र मंठाळकर (नांदेड), ए. एम. महाजन (जळगाव) आणि राजेश गच्चे (पुणे) या पाच उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कुलगुरू निवड समितीने ११ व १२ जानेवारी रोजी घेतलेल्या ४३ उमेदवारांच्या यादीत अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनेक जण कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. मात्र, अंतिम पाच
उमेदवारांच्या यादीत अमरावती विद्यापीठ अंतर्गत एकही नाव न आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या २० जानेवारी रोजी राजभवनात राज्यपाल रमेश बैस हे पाच उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून, अमरावतीचे नवे कुुलगुरू कोण? हे ठरवतील.
नागपूरकर डॉ. मिलिंद बाराहाते मेरिटवर?
नागपूर येथील सी. पी. ॲन्ड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद बाराहाते हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नववे कुलगुरू म्हणून मेरिटवर आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते व्यवस्थापन परिषद तथा अधिनियम समितीवरही होते. कॉलेजच्या एम.बी.ए. विभागात ते समन्वयकपदी दहा वर्ष कार्यरत हाेते. यापूर्वी नागपूरचे डॉ. मुरलीधर चांदेकर यानंतर आता डॉ. मिलिंद बाराहाते हे अमरावतीचे नवे कुलगुरू हाेतील, अशी विश्वसनीय माहिती आहे.