पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल

By प्रदीप भाकरे | Published: January 7, 2024 08:20 PM2024-01-07T20:20:10+5:302024-01-07T20:20:57+5:30

व्हिडिओ व्हायरल : वाहतूक शाखेकडून त्या मुलांचा छडा, पालकांना समज.

Five school children ride a single bike video goes viral | पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल

पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल

अमरावती : पाच शाळकरी मुले एकच दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ शनिवारी समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. तो पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यापर्यंत देखील पोहोचला. त्यांनी त्यांची गंभीर दखल घेत वाहतूक एसीपींना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी दुचाकी, त्यावरील पाचही मुलांची अवघ्या पाच-सहा तासात ओळख पटविण्यात आली. त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.

दंड होत असला तरी ट्रीपलसीट वाहने चालविणे अगदी सामान्य बाब आहे. त्यात कळस म्हणजे एका दुचाकीवर चक्क पाचजण बसलेले अन् तेही सगळेच अल्पवयीन. त्यामुळे वाहतूक एसीपी मनीष ठाकरे व्हायरल व्हिडिओमधील दुचाकी वाहनाचा नोंदणी क्रमांक (एमएच २७ एवाय ५१४०) असल्याबाबतची खात्री करून घेतली. नोंदणी क्रमांक आधारे वाहनाचे मालक मोहम्मद अन्सार (रा. अचलपूर) यांचे सोबत संपर्क केला. आपण ते वाहन चार वर्षांपूर्वी अमरावतीमधील शेख सादिक शेख रजा यांना विक्री केल्याचे अन्सार यांनी सांगितले. त्याआधारे शेख सादिक यांचा शोध घेऊन व्हायरल व्हिडिओमधील दुचाकीबाबत विचारणा केली असता ती दुचाकी आपण जेल कॉर्टर परिसरातील एका व्यक्तीला विक्री केल्याचे सांगितले. पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नसतानाही मनीष ठाकरे व वाहतूक विभागातील अंमलदारांनी तत्काळ त्या इसमाचा शोध घेतला. त्यास पाच शाळकरी विद्यार्थ्यांचा व्हायरल व्हिडिओ दाखविला असता, ती दुचाकी आपलीच असल्याचे त्याने सांगितले. त्यावरील पाच मुलांपैकी दोन मुले आपले असल्याचे मान्य करून ते शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले.

सात हजारांचा दंड

सहायक पोलिस आयुक्त मनीष ठाकरे व पोलिस निरीक्षक संजय आढाव, अंमलदारांनी अवघ्या पाच ते सहा तासात घटनेचा छडा लावला. दुचाकीवरील पाचही मुलांच्या पालकांना वाहतूक विभाग कार्यालयात बोलावून समज दिली. या प्रकरणी त्या दुचाकीवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून सात हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूकच्या पूर्व शाखेने ते वाहन जप्त केले. ते प्रकरण लवकरच न्यायालयात सादर करण्यात येईल.

आपण आपले शाळकरी व अल्पवयीन मुलांना ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, अशा मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. असा प्रकार आढळल्यास वाहतूक विभागातर्फे प्रभावी कारवाई करण्यात येईल. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
मनीष ठाकरे

प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक

Web Title: Five school children ride a single bike video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.