‘पीआरसी’चा पंचतारांकित दौरा
By admin | Published: October 30, 2015 12:29 AM2015-10-30T00:29:19+5:302015-10-30T00:29:19+5:30
पंचायतराज समिती तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये २५ आमदार आणि २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
१० लाखांची तरतूद : नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम
मनीष कहाते अमरावती
पंचायतराज समिती तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये २५ आमदार आणि २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सरबराईकरिता १० लाख रुपयांची तरतूद जिल्हा निधीमधून करण्यात आली आहे. अप्रत्यक्षरीत्या सामान्य जनतेच्या खिशातून पंचतारांकित व्यवस्था करण्यात येणार आहे.
पंचायतराज समितीच्या दौऱ्याकरिता २५ आमदारांसाठी २५ इनोव्हा वातानुकूलित चारचाकी वाहन बुकिंग करण्यात आले आहेत. दौऱ्यामध्ये विविध खात्यांचे उपसचिव, लेखापरीक्षक, स्टेनोसह इतर अधिकारी सहभागी होणार आहेत. याची संख्या जवळपास २५ राहणार आहे. दौऱ्यातील आमदार आणि अधिकारी अशा ५० लोकांची व्यवस्था शहरातील नामांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि स्वागताकरिता १० लाख रुपये तीन दिवसांत प्रशासन खर्च करणार आहेत.
दौऱ्यामध्ये कुठेही उणीव भासता कामा नये म्हणून जिल्ह्यातील १४ ही पंचायत समिती कर्मचारी कामाला लागले आहेत. जि.प. मधील विविध कार्यालयांतील कर्मचारी अधिकारी आपापल्या कामात व्यस्त आहेत. जि.प.च्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात लाखो रुपयांचे कारपेट बसविण्याचे काम गतीने सुरू आहे.
जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, विविध कागदपत्रांसह सुसज्ज करण्यात आल्या आहेत. कोणत्यावेळी पी.आर.सी.चा दौरा कोणत्या गावात जाणार हे जरी अनिश्चित असले तरी आम्ही सर्व व्यवस्थापन करू, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एरवी सामान्य जनतेला एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासन निधी नसल्याचे सांगतात. परंतु पी.आर.सी.च्या दौऱ्याकरिता तीन दिवसांत १० लाख रुपये खर्चाला पैसा येतो कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.