कर्जमुक्तीसाठी वऱ्हाडात हवे पाच हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:55 PM2020-01-23T14:55:01+5:302020-01-23T14:56:26+5:30
पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत.
गजानन मोहोड
अमरावती - पश्चिम विदर्भात कर्जमाफी योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेले ७ लाख १३ हजार ६०९ शेतकरी निष्पन्न झालेत. त्यांच्याकडे ४९७० कोटी ९६ लाख ८२ हजार रुपयांची थकबाकी आहे. मात्र, यापैकी १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते आधार लिंक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कर्जमुक्तीमध्ये बाधा येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदती पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँक अधिकाऱ्यांद्वारा १ ते २८ रकान्यांच्या प्रपत्रात शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस यासाठी शासनाचे पोर्टल सुरू होणार आहे. यामध्ये एकदा पोर्टलवर माहिती 'अपलोड' झाल्यावर त्यात बँकास्तरावर बदल करता येणार नाही. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील आदी माहिती अचूक पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यापूर्वीच दिले आहे.
या कर्जमुक्ती योजनेसाठी ५ लाख ६२ हजार २९७ शेतकऱ्यांनी बँक खाते आधार संलग्न केले आहे. बुधवारी १ लाख ३५ हजार ८२५ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केली असली तरी अद्यापही १४ हजार ८३३ शेतकऱ्यांनी आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत. यासर्व शेतकऱ्यांची यादी सोसायटी, बँकास्तरावर लावल्याची माहिती सहकार विभागाने दिली.
पश्चिम विदर्भाची सद्यस्थिती (लाखांत)
जिल्हा खातेदार थकबाकी आधार बाकी
अमरावती १५११७५ ११७७३३.०० ४०९४
अकोला ११३८४९ ७७५८४.४३ १७८२
यवतमाळ १३७९१५ ८३३१२.६३ ५२४७
बुलडाणा २००९४० १४०७४४.०० २६०४
वाशीम १०९७३० ७७७२२.२६ ११०६
एकूण ७१३६०९ ४९७०९६.०० १४८३३
योजनेच्या लाभासाठी १ ते २८ कॉलममध्ये माहिती भरण्यात येत आहे. १ तारखेला पोर्टल सुरू झाल्यावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती त्यात भरली जाईल.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती