विश्वशांतीसाठी पाच हजार कि.मी.ची पदयात्रा; पुणे ते नागासाकी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:52 AM2019-02-07T11:52:23+5:302019-02-07T11:52:55+5:30
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.
मोहन राऊत
अमरावती : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.
पुणे येथून १२ जानेवारी रोजी योगेश माथूरिया व जालंदरनाथ चेनॉली यांनी ही पदयात्रा सुरू केली. २६ दिवसांत त्यांनी ७४२ किलोमीटरचे अंतर पार करीत धामणगाव गाठले. गांधीजींचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी शांतिदूत योगेश व जालंदरनाथ यांचा हा प्रवास आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गाने ११ मे रोजी बांगलादेशातील गांधीजी आश्रमामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर १९ मेपासून हिरोशिमा नागासाकी येथे ही पदयात्रा मार्गक्रमण करतील. यापूर्वी पूर्व भारतातील १८ राज्य, श्रीलंका ते दक्षिण आफ्रिका असा १२ हजार ६७६ कि.मी. प्रवास त्यांनी ४१९ दिवसांत पूर्ण केला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता पुलगाव येथे हे विश्वमित्र रवाना होतील. यानंतर दोन दिवस सेवाग्रामातील गांधी कुटीमध्ये मुक्काम करणार आहेत. धामणगाव येथे त्यांचे माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण चांडक, संदीप मुंदडा, महेंद्र मुंदडा, मुकेश राठी, आशिष मुधडा, राजेश झंवर, आशिष पनपालिया, सतीश बूब यांनी सत्कार केला.