पाच हजार ग्रामस्थ बसतात रस्त्यावर शौचास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:03+5:302021-03-22T04:12:03+5:30

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : प्रत्येकाने घरोघरी शौचालय बांधावे त्याचा वापर नियमितपणे करावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक ...

Five thousand villagers sit on the streets defecating | पाच हजार ग्रामस्थ बसतात रस्त्यावर शौचास

पाच हजार ग्रामस्थ बसतात रस्त्यावर शौचास

Next

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : प्रत्येकाने घरोघरी शौचालय बांधावे त्याचा वापर नियमितपणे करावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना राबविल्या. सहा वर्षांत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक शौचालय बांधण्यात आली. तरीही पाच हजारांपेक्षा अधिक ग्रामस्थ दररोज रस्त्यावर शौच करण्यासाठी बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुरस्कारप्राप्त गावांतही दुर्गंधी पाहायला मिळत आहे.

भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी लाभार्थींनी स्वत: पुढाकार घ्यावा, यासाठी सन २०११ च्या जनगणनेमधील आकडेवारीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली. जिल्हा प्रशासनापासून तर गावपातळीपर्यंत हे अभियान युद्धस्तरावर राबविण्यात आले. गावागावांत घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र, या शौचालयांचा वापर कुठे इंधन, गोवऱ्या ठेवण्यासाठी, तर कुठे इतर साहित्य ठेवण्याकरिता केले जाते. दुसरीकडे ग्रामस्थ रस्त्यावर शौचालय येतात.

------------

पुरस्कारप्राप्त गावांत दुर्गंधी

केंद्र व राज्य शासनाने स्वच्छता अभियानांतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व आबा पाटील स्मार्ट ग्राम अभियान पुरस्कार अशा स्पर्धा राबविण्यात आल्या. याअंतर्गत तालुक्यातील सात ते आठ गावे आजपर्यंत स्पर्धेत पुरस्काराचे मानकरी ठरले. मात्र, या गावातील रस्त्यावर शौचास बसण्याची संख्या अधिक आहे.

------------

उघड्यावर शौचास बसल्याने आजारांत वाढ

रस्त्यावर केलेल्या विष्ठेचे अनेक जंतू दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या चाकांनी शहरी व ग्रामीण भागात प्रवेश करतात. विष्ठेमध्ये रोगाचे जंतू, जंताची अंडी व अळ्या असतात. त्या अतिशय सूक्ष्म असल्याने माणसांच्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. या रोगजंतूचा प्रसार हवा, पाणी, माशा, झुरळ, हातांचा स्पर्श किंवा कीटक यांच्यामार्फत होतो. पोटात दुखणे, अतिसार, कावीळ हे संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे दिसून येते.

------

लोकप्रतिनिधींविरुद्ध कारवाईची तरतूद

उघड्यावर शौचाला गेल्यावर १२ हजार रुपये दंड आणि भारतीय दंड संहिता कलम २६९ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे व रोगराई पसरवणे याप्रकरणी सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय सुविधा न पुरविल्याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अंतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त अपिल) नियम १९६४ अंतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. सदर कामात अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामकाजात अडथळा व शासकीय कर्मचाऱ्यांना दमबाजी करणे याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३५३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

----------------

अनेकांच्या घरी शौचालय असून, त्याचा वापर होत नाही. रस्त्यावर शौचास बसल्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. तालुका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे.

दुर्गाबक्षसिंह ठाकूर, सरपंच, हिंगणगाव

--------------

तालुक्यातील प्रत्येक गावात आता ‘गुड मॉर्निंग पथका’द्वारे कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ग्रामसेवकांनी ही प्रक्रिया त्वरित राबवावी.

- माया वानखडे, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे पंचायत समिती

Web Title: Five thousand villagers sit on the streets defecating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.