मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:51 PM2018-12-13T19:51:06+5:302018-12-13T19:51:51+5:30
एका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा
- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१३ मध्ये घडलेल्या शिकारीसंदर्भात काही पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हाती आलेले जैविक नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांनीही दुजोरा दिला आहे.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत अंजनगांव वनपरिक्षेत्रातील खोंगड गावाच्या शेतीच्या बाजूला पहिला वाघ २०१७ च्या दिवाळीत, दुसरा वाघ २०१७ च्या हिवाळ्यात लाल मामा मंदिराजवळ, तिसरा वाघ २०१८ च्या होळीला गिरगुटीजवळ रक्षा नालानजीक, चौथा वाघ दहा महिन्यांअगोदर सचिन बेलसरे यांच्या शेताजवळ शिकाऱ्यांनी मारला. पाचवा वाघ (बिबट) २०१८ मधील होळीच्या एक महिन्याआधी शंकर जामुनकर यांच्या शेतात मारण्यात आला. आरोपी संजय उर्फ बंसीलाल हिरालाल जामुनकर (रा. गिरगुटी) यांचे जबाबावरुन चौकशी अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पऱ्हाड यांच्यासमोर हे जबाब नोंदविले गेले आहेत.
दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सन २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. यात वनखंड ८६० मध्ये मुसळीची तस्करी आणि सायाळची शिकार ८ ऑगस्ट २०१८ ला घडली आहे. यात गिरगुटी येथील ३२ आरोपी आहेत. वनखंड ९४६ मध्ये १८ सप्टेंबर २०१८ ला सांबराची शिकार झाली. त्यात १३ आरोपी आहेत. वनखंड ९४५ मध्ये चांदी अस्वल आणि सायाळची शिकार २० सप्टेंबर २०१८ ला झाली आहेत. यात १२ आरोपी असून, या तिन्ही गुन्ह्यांत सानू तानू दारसिम्बे (रा. गिरगुटी) हा मुख्य आरोपी आहे. हे सर्व वनखंड मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रातील आहेत. यात चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट दाखल केला आहे.
पुरावे अद्याप दूरच!
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत सहा महिन्यात घडलेल्या पाच वाघांच्या हत्येसंदर्भात शिकार झालेले ठिकाण, अवयव व शिकारीसाठी वापरलेले हत्यार आदी पुरावे चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले नाहीत.