पाच वर्षीय मादी बिबटाचा ब्राँको न्यूमोनियाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:30+5:302021-01-09T04:10:30+5:30

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी येथील घटना, इन कॅमेरा शवविच्छेदन अमरावती: चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी येथे एका पाच वर्षीय मादी ...

Five-year-old female leopard dies of broncho-pneumonia | पाच वर्षीय मादी बिबटाचा ब्राँको न्यूमोनियाने मृत्यू

पाच वर्षीय मादी बिबटाचा ब्राँको न्यूमोनियाने मृत्यू

Next

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी येथील घटना, इन कॅमेरा शवविच्छेदन

अमरावती: चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी येथे एका पाच वर्षीय मादी बिबटाचा ब्राँको न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. या मृत मादी बिबटाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक, वनाधिकाऱ्यांची चमू उपस्थित होती.

चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, मध्य चिरोडी नियतक्षेत्र वनखंड क्रमांक ३०० मध्ये वनरक्षक आर.वाय. कैकाडे हे गस्तीवर असताना, त्यांना एका ठिकाणाहून कमालीचा दुर्गंध येत होता. त्यांनी शोध घेतला असता, बिबट मृत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठांना मोबाईलवर दिली. त्याअनुषंगाने सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. चांदूर रेल्वेचे पशुधन विकास अधिकारी राजेंद्र अलोणे, शेंदोळा येथील पशुधन विकास अधिकारी नितीन पाटणे यांनी मादी बिबटाचे शवविच्छेदन केले. ब्राँको न्यूमोनियाने श्वासनलिका बंद पडल्याने या मादी बिबटाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल दोन्ही पशुधन विकास अधिकाऱ्यांनी

दिला.

मादी बिबटाला ब्राँको न्यूमोनियाने ताप आला. पाच ते सहा दिवसांपासून पोटात काहीही नव्हते आणि पोषक तत्त्वाच्या कमतरतेमुळे अतिशय अशक्तपणामुळे शरीर सुन्न पडले. यामुळे ती दगावली, असे पशुधन अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. शवविच्छेदनानंतर मृत मादी बिबटाची जाळून नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. या घटनेची चौकशी उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सहायक वनसंरक्षक ज्योेती पवार यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे हे करीत आहेत.

Web Title: Five-year-old female leopard dies of broncho-pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.