‘शिवाजी’ पुन्हा हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
By गणेश वासनिक | Published: September 12, 2022 06:00 AM2022-09-12T06:00:23+5:302022-09-12T06:00:53+5:30
‘प्रगती’ची बाजी, एकूण ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनेलचे ८ सदस्य विजयी झाले.
अमरावती : राज्यात दुसऱ्या क्रमाक्रांची संस्था असलेल्या अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. यात ‘प्रगती’ विरूद्ध ‘विकास’ या दोन पॅनलमध्ये काट्याची टक्कर झाली. रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास हाती आलेल्या निकालात ‘प्रगती’ पॅनलने नऊपैकी ८ जागा ताब्यात घेत दबदबा निर्माण केला. अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा हर्षवर्धन देशमुख (३८९) यांच्या गळ्यात पडली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रगतीचे ॲड. गजानन केशवराव पुंडकर (३९२), केशवराव मेतकर तर ‘विकास’चे भैयासाहेब पाटील विजयी झाले.
एकूण ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनेलचे ८ सदस्य विजयी झाले. त्यात अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह दाेन उपाध्यक्ष तसेच काेषाध्यक्ष दिलीप इंगाेले आणि चार सदस्यांचा समावेश आहे. सदस्यपदाच्या निवडणुकीत हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक ४९० मते प्राप्त झाली आहे. तर केशवराव गावंडे यांना ३८७ , सुरेश खाेटरे ३३१ , सुभाष बनसोड यांनी २८९ मते घेऊन विजयाची माळ गळ्यात घातली आहे. केवळ एकमात्र उपाध्यक्ष विकासच्या वाट्याला गेला. मतमाेजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. गांधी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. जितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली.