पाच वर्षांत आर्थिक गुन्हे शाखेकडे २० गुन्हे तपासात प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:54+5:302021-02-07T04:12:54+5:30
अमरावती/ संदीप मानकर पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या आर्थिक घोटाळ्यातील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाकरिता आले. मात्र, आतापर्यंत ...
अमरावती/ संदीप मानकर
पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या आर्थिक घोटाळ्यातील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाकरिता आले. मात्र, आतापर्यंत २० गुन्ह्यांचे तपासकार्य प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास करून या प्रकरणांचे चार्जशीट न्यायालयाला केव्हा सादर करणार, असा सवाल फसवणुकीत अडकलेल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
२०१५ ते २०२० दरम्यान दाखल २० ही प्रकरणांचे गुन्हे उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी सांगितले. गत वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे आठ गुन्हे तपासाकरिता आले होते. पॅनकार्ड क्लब, जीवन समृद्धी प्रा. लि. कंपनीने केलेले घोटाळे विशेष गाजले. तीन गुन्हे संस्थात्मक संस्थेशी निगडित आहेत. त्यामध्ये महापालिकेचा शौचालय घोटाळ्यात बनावट देयके सादर करून देयके काढण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले असून, त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
बॉक्स:
तीन संस्थांमध्ये झाला अपहार
आर्थिक गुन्हे शाखेत २० प्रकरणांत तपास सुरू आहे. त्यात तीन संस्थांमध्ये अपहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यातील एक प्रकरण अमरावती महापालिकेच्या शौचालय घोटाळ्याचे आहे. यात बनावट बिले सादर करून देयके काढण्याचा ठपका होता यात काही आरोपींना अटकही करण्यात आली. तीन्ही संस्थांमधील गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ३८.४६ कोटी असून यामध्ये १८ आरोपींचा समावेश आहे. शासनाने याप्रकरणी संस्थामक अपहारप्रकरणी अचल संपती जप्त केली आहे.
बॉक्स:
गाजलेला घोटाळा
पॅनकार्ड क्लबमध्ये ज्या नागरिकांनी पैसे गुंतविले त्यांना आकर्षक परतावे देतो म्हणून फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा शहर हद्दीतील राजापेठ ठाण्यात २०१६ मध्ये नोंदविल्या गेला.
यामध्ये पॅनकार्ड क्लबने भारत व इतर देशातील हॉटेल व रिसोर्टसोबत करार करून ज्या नागरिकांनी पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली. त्यांना या हॉटेल व रिसोर्टमध्ये कमी दरात राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच याच व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यास आकर्षक परतावे देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली होती. यात अमरावती येथील एका नागरिकाने मुलीच्या लग्नाकरिता चांगले परतावे मिळतील म्हणून पॅनकार्ड क्लबमध्ये ८० हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना लाभ मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार नोंदविली. ३७ कोटी ७६ लाखांचा सदर घोटाळा असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंद आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या सहा संचालकांवर गुन्हा नोंदविला होता. या घोटाळ्याचा अद्यापही तपास सुरू आहे.
कोट
आर्थिक गुन्ह्यांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. विविध प्रकरणांत संबंधित कागदपत्र गोळा करून त्याची पडताळणी करून पुरावे तयार करण्याचे काम सुरू आहे. तपासासंर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून आढावा घेण्यात येईल.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती