विजेने घेतले पाच वर्षांत ११७ बळी
By Admin | Published: June 14, 2015 12:25 AM2015-06-14T00:25:06+5:302015-06-14T00:25:06+5:30
दरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले
अमरावती विभागाची आकडेवारी : पावसाळ्यात शेतमजुरांचा अधिक मृत्यू
मोहन राऊ त अमरावती
दरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले प्राण गमवावे लागले़ यात सर्वाधिक मृत्यू शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचे झाले आहेत़
दिवसेंदिवस बदलत्या निसर्ग चक्राची हानी सर्वच प्राणीमात्रांना बसत आहे़ उन्हाळ्यात ऊन्ह अधिक हिवाळ्यात थंडीचे प्रमाण सर्वाधिक असले तरी पावसाची सरासरी मात्र पावसाळ्यात कमी आहे़ ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो़ मागील पाच वर्षांत विजेने बळी घेतले आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतमजुराला आपले प्राण या विजेमुळे गमवावे लागले़ विशेषत: यात पुरूष शेतमजुराचा मृत्यूत आकडा मोठा आहे़
पाच वर्षांत वाढली आकडेवारी
शेतमजूर शेतात गेल्यानंतर येणाऱ्या पावसामुळे थेट मोठ्या झाडांचा आधार घेतोय व नेमक्या याच ठिकाणी वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागतो. सर्वाधिक विजेचे बळी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात गेले आहेत़ तिसऱ्या क्रमांकावर अकोला, वाशीम हे जिल्हे आहेत़ येथील मृत शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असली तरी त्या कुटुंबीयांना मिळाणाऱ्या तोकड्या मदतीमुळे संसाराची मोठी हानी झाली आहे़ मागील दोन दशकात वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे मृग व आर्द्रा नक्षत्रात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे़
यावर्षीदेखील विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
२० हजार अॅम्पियरचा प्रवाह
आभाळातल्या विजेपासून धोका पोहचू नये, सुरक्षितता मिळावी यासाठी, कॉक्स नावाच्या अभियांत्याने सूचना दिल्या आहेत़ आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वत: काहीही फरक नसतो़ परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अॅम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता २० ते २०० किलो अॅम्पियर इतकी असते़ जमिनीवर वीज पडते तेव्हा जमिनीतून किमान २० हजार अॅम्पियर इतका वीज प्रवाह वाहू लागतो़ अशा वेळी तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरातील दोन बिंदूत व्होल्टेजमध्ये वाढ होते़ वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास कि मान विरोध करणाऱ्या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते़ उघड्यावर चालणाऱ्या, खेळणाऱ्या किंवा शेतात असलेल्या माणसाच्या डोक्यावर किंवा खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते़ तसेच त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ त्यामुळे शरीरावर अशा गंभीर भाजण्याच्या जखमा होतात़ मनुष्य चालत असेल तर त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता़ कोपऱ्यापासून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचे काही अपघात प्रकरणात दिसून येते़
अशी घ्यावी काळजी
विजेचा कडकडाट होत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन उकिडवे बसावे, गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडू सारखा आकार होईल असे पहावे. एखांद्या उंच इमारतीजवळ असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा़ आपण घरात असल्यास घरातील नळ, टेलीफोन, खिडक्या आणी विद्युत उपकरणापासून दूर रहावे़ जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या परिसरात असेल तर शाळेचा आश्रय घ्यावा. मोटार साइकलने प्रवास करत असाल तर किंवा इतर कुठल्याही ट्रॅक्टरसारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनांपासून ताबडतोब दूर जाऊन चेंडूसारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे़ बस सारख्या वाहनात असाल तर आतच बसून रहावे अशा खबरदाऱ्या घेतल्या तर कडकडणाऱ्या विजेपासून सरंक्षण मिळण्यास मदत होईल़
निसर्गाच्या बदलत्या चक्रक्रमाने विजेमुळे प्राणहानी होते शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतमजूर व शेतकऱ्यांनी या विजेपासून आपले सरंक्षण करण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़पावसाळ्यात अधीक पावसाचा जोर तसेच विजेचा कडकडाट होत असल्याचे दिसताच एखांद्या शेतातील पक्या झोपडीचा आश्रय घ्यावा अथवा घराकडे यावेत मोठ्या वृक्षाखाली थांबू नयेत़
- नितीन व्यवहारे,
एस़डी ओ़चांदूर रेल्वे.