निलंबित प्राचार्याकडून महाविद्यालयात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:58+5:302021-08-20T04:17:58+5:30
अमरावती : संस्थेने निलंबित केलेल्या माजी प्राचार्याने विद्यमान प्राचार्यांचे अधिकार हिरावून चोरपावलाने येऊन सकाळी ७ वाजताच ध्वजारोहण करून घेतले. ...
अमरावती : संस्थेने निलंबित केलेल्या माजी प्राचार्याने विद्यमान प्राचार्यांचे अधिकार हिरावून चोरपावलाने येऊन सकाळी ७ वाजताच ध्वजारोहण करून घेतले. याबाबत कळताच संस्थेचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर व विद्यमान प्राचार्य संगीता पुंडे यांनी खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
राहुल व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर यांनी खोलापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या तत्कालीन प्रभारी प्राचार्य अशोक गिरी यांना काही कारणास्तव २१ जानेवारी रोजी निलंबित केले होते. याबाबत शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाने या निलंबन प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर १० मार्च रोजी संगीता पुंडे यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व व्यवहार व व्यवस्थापन संगीता पुंडे यांच्या नियंत्रणाखाली चालत असताना व निलंबित माजी प्राचार्य अशोक गिरी यांचे मुख्यालय अमरावती येथे ठेवले होते.
अशातच १५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयामध्ये
विद्यमान प्राचार्य संगीता पुंडे यांच्या हस्ते सकाळी ७ ते ७.३० वाजता झेंडावंदन आयोजित करण्यात आला असतानाच निलंबित प्राचार्य अशोक गिरी हे सकाळी सात वाजता राष्ट्रध्वज घेऊन महाविद्यालयात पोहचले आपणच या महाविद्यालयाचे प्राचार्य आहे, असे भासवत व स्वत:च झेंड्यावर राष्ट्रध्वज चढविला व विद्यमान प्राचार्य संगीता पुंडे यांचा अधिकार हिरावून स्वतः ध्वजारोहण केले, त्यामुळे सदरच्या घटनेनंतर मधुकर अभ्यंकर हे शाळेत पोहोचून त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती घेतली व निलंबित प्राचार्य अशोक गिरी यांच्याविरुद्ध खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विद्यमान प्राचार्य संगीता पुंडे या मागासवर्गीय महिला असून त्यांचे अधिकार डावलून बळजबरीने अशोक गिरी यांनी ध्वजारोहण केल्यामुळे याप्रकरणी गिरी यांच्यावर कडक कारवाई करून चौकशी लावावी, अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून मधुकर अभ्यंकर यांनी केली आहे.
बॉक्स
संस्थेचा आदेश व शिक्षण उपसंचालक यांनी मान्यता दिल्याप्रमाणे अशोक गिरी यांना निलंबित केले आहे, त्यामुळे या महाविद्यालयाशी सध्या तरी त्यांचा कुठलाही संबंध नाही, परंतु हेकेखोरपणामुळे व संस्थेचे तसेच न्यायालयाचे आदेश झुगारून त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे ,15 ऑगस्ट रोजी झालेला प्रकार देखील गंभीर असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, त्यामुळे याबाबत मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे,
मधुकर अभ्यंकर, अध्यक्ष, भूमिपुत्र शिक्षण प्रसारक मंडळ ,अमरावती