ना भाडे मिळाले, ना भाडेकरू; फ्लॅटधारकाला ५० हजारांचा चुना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 02:23 PM2022-04-06T14:23:34+5:302022-04-06T14:32:53+5:30
गुगल-पे अकाऊंट आपण जसे सांगतो तसे हाताळण्याच्या सूचना त्या मोबाइलधारकाने केल्या. त्यानुसार फ्लॅटधारकाने गुगलपे ऑपरेट केले असता, ५० हजार रुपये क्रेडिट होण्याऐवजी डेबिट झाले.
अमरावती : फ्लॅटचे तीन महिन्यांचे भाडे आगाऊ पाठविण्याची बतावणी करून एका फ्लॅटधारकाला ५० हजार रुपयांना गंडविण्यात आले. १० व ११ ऑक्टोबर २०२१ रोजी हा फसवणुकीचा प्रकार घडला असला तरी याप्रकरणी ४ एप्रिल रोजी शहर कोतवाली पोलिसांनी सायबरच्या पत्रानंतर गुन्हा नोंदविला.
मांगीलाल प्लॉट येथील ६३ वर्षीय गृहस्थाचा श्रीकृष्णपेठ येथे टू बीएचके फ्लॅट असून, तो भाड्याने द्यायचा असल्याबाबतची जाहिरात त्यांनी एका संकेतस्थळावर टाकली. त्यावर १० ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे येथून अनिकेत काळभोर बोलत असल्याचा कॉल आला. त्याने सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक असल्याची बतावणी केली. अमरावती मधील फ्लॅट भाड्याने हवा म्हणून त्याने त्यासाठी त्याचे सीआयएसएफचे ओळखपत्र, आधारकार्ड पाठविले. आपल्या शासकीय नोकरीच्या पगाराच्या खात्यातून ५० हजार रुपये ॲडव्हान्स पाठवितो, असे सांगून येथील फ्लॅटधारकाची दिशाभूल केली.
गुगल-पे अकाऊंट आपण जसे सांगतो तसे हाताळण्याच्या सूचना त्या मोबाइलधारकाने केल्या. त्यानुसार गुगलपे ऑपरेट केले असता, ५० हजार रुपये क्रेडिट होण्याऐवजी डेबिट झाले. त्या मोबाइलधारकाने आपल्याला भाड्याचा ॲडव्हान्स न देता आपल्याच खात्यातून ५० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याची बाब लक्षात येताच त्या ६३ वर्षीय वृद्धाने ११ ऑक्टोबर रोजी आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ती सहा महिन्यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.
ऑनलाइन पेमेंट सजगपणे करा. भूलथापांना बळी पडू नका. खात्री केल्याशिवाय व्यवहार करू नका. फेक आयडी दाखवून, पाठवून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
विक्रम साळी, पोलीस उपायुक्त