पूर नियंत्रण कक्ष थेट मंत्रालयातील व्हॉट्सअॅप ग्रुपशी ‘कनेक्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 10:25 PM2019-07-05T22:25:50+5:302019-07-05T22:25:57+5:30
अमरावती : पूर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या घटना त्वरित अद्ययावत कराव्या लागणार आहे. माहितीचे ...
अमरावती : पूर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या घटना त्वरित अद्ययावत कराव्या लागणार आहे. माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचा एक व्हॉट्सअॅप तयार करण्यात आला असून, त्यावर थेट मंत्रालयातील अधिकारी ‘कनेक्ट’ राहणार आहेत. त्यामुळे ग्रुपमधील अधिका-यांना २४ तास अलर्ट राहावे लागणार आहे. त्यासंदर्भाचे परिपत्रक शासनाने यापूर्वीच काढले असून, ते राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आले आहे. राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत खोरेनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, ग्रुपची निर्मिती ‘पूर नियंत्रण कक्ष’ मंत्रालय यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यात सचिव, कार्यकारी संचालक, संबंधित मुख्य अभियंता व पूर नियंत्रण कक्षातील इन्चार्ज आॅफिसरसुद्धा राहणार आहेत.
-------------
पूरनियंत्रणाबाबत वेळोवेळी 'अपडेट'
धरणातून विसर्ग, पडलेला पाऊस, पूर्ण जलसंचय पातळी व सध्याची पाणीपातळी यासंदर्भाची माहिती दर चार तासांनी सदर व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपडेट करावी लागणार आहे. या युनिटसाठी एक नवीन मोबाइल घेण्याच्या सूचना होत्या. तो २४ तास पूरनियंत्रण कक्षात असेल, जेणेकरून कायमस्वरूपी संपर्कात राहणे शक्य होईल.
------------
वायरलेस यंत्रणा सज्ज
पूरनियंत्रण कक्षातील पाळी (ड्युटी) बदलत असताना मोबाइलवर माहिती 'अपडेट' करूनच ड्युटी संपवावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. नवीन येणाºया अभियंत्यास मोबाइल हस्तांतरित करण्यात यावा. पूरनियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणा सतत सज्ज ठेवावी लागणार आहे. सदरच्या मोबाइल ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबत घटना त्वरित 'अपडेट' कराव्या लागणार आहेत. ग्रुप मेंबर्सना त्यांच्याकडील माहिती व मत त्यावर नोंदवावी लागणार आहे.
---------
३१ आॅक्टोबरपर्यंत कक्ष कार्यरत
पावसाळ्यात महसूल व वनविभागाच्या अधिनस्थ मंत्रालयीन नियंत्रण कक्षात पूर नियंत्रणाच्या संनियंत्रणासाठी जलसंपदा विभागामार्फत १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीसाठी अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूरनियंत्रण कक्षात काम करताना कुठले नियम पाळावेत, यासाठी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.