Flood: अतिवृष्टीमुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद. पुराचे पाणी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:42 PM2022-08-07T23:42:10+5:302022-08-07T23:42:43+5:30
Flood: वरूड तालुक्यात रविवारी दिवसभरात दोनदा झालेल्या पावसामुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद झाला आहे. वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे.
वरूड-जरूड (अमरावती) : वरूड तालुक्यात रविवारी दिवसभरात दोनदा झालेल्या पावसामुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद झाला आहे. वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे.
वरूड तालुक्यात रविवारी दुपारी दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. वरूड, शेकदरी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेंदूरजना घाट, जरूड, मांगरुळी पेठ या गावातील जीवना, देवना, चुडामणी, सोकी या नद्यांना महापूर गेला. नदीशेजारील वस्तीमध्ये पाणी शिरले. गव्हाणकुंड येथील कपिलेश्वर शिवमंदिर पूर्णत: पाण्यात बुडाले आहे. बहादा गावालाही पाण्याने वेढले आहे. वरूड-अमरावती महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वरूड ते जरूड मार्गावर संपर्क तुटला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मांगरूळ येथील उंच पुलाला पाणी टेकण्यासाठी केवळ अर्धा फूट शिल्लक असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
जरूड येथील रविवार बाजार व नदीकाठची घरे पाण्याने बाधित झाला. राहुल हरले या व्यक्तीच्या घरत सुमारे १२ फूट पाणी शिरले आहे. वरूड शहरातील शनिवारपेठ, मिरची प्लॉटही पाण्याखाली गेला असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. पाणीपातळी अजूनही कमी झालेली नसल्याने नागरिक भयभीत आहेत. मिळेल ती साधने घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठले आहे. पूर पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची त्यांना आवरताना दमछाक होत आहे. दरम्यान, गेल्या ४० वर्षातील हा सर्वात भयावह जलप्रलय असल्याचे नागरिकांनी सांगितले.