दर्यापूर तहसीलवर पूरग्रस्तांचा मोर्चा
By admin | Published: July 3, 2014 11:19 PM2014-07-03T23:19:46+5:302014-07-03T23:19:46+5:30
सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम
दर्यापूर : सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आ. अडसूळ यांनी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार राहुल तायडे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली. पूरग्रस्तांना आतापर्यंत घरे बांधण्यासाठी फक्त ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमध्ये केवळ ३० टक्केच पुनर्वसन झाले असून ७० टक्के पुनर्वसनाचे कार्य अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, वीज, पाणी आदी सोई पुरविण्यात आलेल्या नाहीत. पुनर्वसनग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघणार नाही, तोवर न हटण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. जिल्हाधिकऱ्यांनी ही समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
ठाकूर जमात ही अनुसूचित जमातींमध्ये मोडते. तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठाकूर जमातीच्या ११ लोकांना जात प्रमाणपत्र दिले. पण, महिनाभरापूर्वी दर्यापूर येथे रुजू झालेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी नागरिकांच्या जात प्रमाणपत्र अर्जात त्रुटी काढून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे जात प्रमाणपत्रांअभावी या जमातीतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्यावरही उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी तहसीलदार राहुल तायडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर, तालुकाप्रमुख देवीदास वाळके, नाना देशमुख, बाबाराव पाटील बरवट, पं.स. सभापती मंगला रहाटे, गटविकास अधिकारी थोरात, मोहित चांदुरे, भैया बरवट, सुधीर खांदे, राजू कराळे, रूपेश गणात्रा आदी उपस्थित होते.