पूर पावसामुळे रस्ते,पुलांचे १६ कोटीवर नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:50+5:302021-09-10T04:17:50+5:30
अमरावती: गत दोन महिन्यात विशेषता जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन रस्ते खराब झाले आहेत. यामध्ये जिल्हा ...
अमरावती: गत दोन महिन्यात विशेषता जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन रस्ते खराब झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार ग्रामीण भागातील छोटे-मोठे तब्बल २९ रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची लांबी ५६ किलोमीटर एवढी आहे. खराब पूल व रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास १६ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तयार केला असून, तो विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविला आहे. गत जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये पाऊस अनियमित असला तरी तो काही दिवस नियमित व समाधान कारक पडल्याने जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी अनेक रस्ते खचले, काही तुटले, तर काही खरडून निघाले. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांवरील ३१ पूल तुटल्याचे पाहणी दिसून आले. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करताना पुलाची दुरुस्ती करणे दळणवळणासाठी आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची एकूण लांबी ५६ किलोमीटर असून त्यांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे या पावसामुळे ३१ पूल खराब झाले असून, त्यांचे दुरुस्तीसाठी ६ कोटी ६७ लाख रुपये खर्च करावा लागणार आहे.
बॉक्स
शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव
पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानामुळे रस्ते व पुल दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभागाने शासनाकडे विभागीय आयुक्तांमार्फत १६ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव निधीसाठी सादर केल्याची माहिती बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
बॉक्स
खराब रस्त्याची माहिती
तालुका रस्ते पूल खर्च (कोटीत)
चांदूर रेल्वे ०३ ०५ ३.१०
धामणगाव रेल्वे ०६ १४ ७.७०
चिखलदरा १२ ०५ ४.२२
धारणी ०९ ०७ १.६०
एकूण २९ ३१ १६.६२