शासकीय कार्यालयात फुलली हिरवळ
By Admin | Published: April 19, 2015 12:13 AM2015-04-19T00:13:54+5:302015-04-19T00:13:54+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत सावलीची नितांत गरज भासते. ...
रूक्ष उन्हाळा सुसह्य : सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिश्रम
अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत सावलीची नितांत गरज भासते. शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाच्या आवारत थांबावे लागत असून तेथील हिरवळीमुळे उकाड्यापासून बचाव करणे शक्य होत आहे.
अमरावती हे विभागीय ठिकाण असल्याने शासकीय कामानिमित्त पाचही जिल्ह्यांतील नागरिकांची ये-जा सुरू असते. काही कारणास्तव कामांना उशीर होतो. तोपर्यंत उन्हात फिरण्यापेक्षा नागरिक कार्यालयाबाहेर बसतात. सार्वजनिक बांधकाम विभागात नियोजनबद्दरीत्या हिरवळ फुलविण्यात आली आहे. काही कर्मचारी कामाचा ताण कमी करण्याकरिता थोडा वेळ झाडाखाली निवांत बसतात. त्यामुळे त्यांच्या मनाला प्रसन्नता लाभते. उन्हाळ्याच्या दिवसांत बाग फुलविणे म्हणजे एक कसरतच म्हणावे लागेल. पण ही किमया येथील कर्मचारी व बागवान जोपासली आहे.
सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात १५ बाय २० मीटरचे उद्यान तयार करण्यात आले असून त्यामध्ये गुलाबाची विविध प्रकारची झाडे, शोची झाडे, लॉन, निर्माण करण्यात आले आहे. नागरिकांना या उद्यानाचा दिलासा मिळत आहे. याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी उसंचालक उद्याने व उपवने विभागाकडे आहे. येथे नियमित सिंचनाची व्यवस्था बागवान पाहतात. कार्यालय परिसरात मोठ्या व्यासाची विहीर असल्याने सिंचनाची उत्तम सोय येथे झालेली आहे.
शासकीय कार्यालयांत हिरवळ असणे गरजेचे आहे. थोडा वेळ झाडाखाली बसल्यानंतर मन प्रसन्न होते. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनाही बसण्याची सुविधा होते. येथील झाडांची योग्य देखभाल केली जात आहे.
-एन.यू. देशमुख,
कनिष्ठ अभियंता, बांधकाम उपविभाग.