अश्रूंची झाली फुले; रक्तदानाने जागवल्या इब्राहिमच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 05:00 AM2022-02-14T05:00:00+5:302022-02-14T05:00:48+5:30
व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बुशरा पठाण यांनी आध्यात्मिक गुरुकुंज आश्रम येथे रक्तदान शिबिराची कल्पना प्रत्यक्षात उतरविली. डझनावरी लोकांनी इब्राहिम या जगी नसताना त्याच्या १७ व्या वाढदिवशी स्वेच्छेने रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : व्हॅलेंटाईन डे आला की, अनेकांच्या मनात प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात. प्रेम ही निरागस, निरामय, व्यापक भावना. व्हॅलेंटाईन म्हणजे केवळ प्रियकर अन् प्रेयसीमधलेच प्रेम नव्हे, ते कुठल्याही नात्यात बहरू शकते. व्यक्त होऊ शकते. गुरुकुंज मोझरी येथील एका ‘माय’ने आपल्या मुलाच्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करून त्याचा प्रत्यय दिला आहे. गेल्या वर्षीच त्या ‘माय’च्या प्राणप्रिय असलेल्या ‘इब्राहिम’ने अकाली एक्झिट घेतली.
व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बुशरा पठाण यांनी आध्यात्मिक गुरुकुंज आश्रम येथे रक्तदान शिबिराची कल्पना प्रत्यक्षात उतरविली. डझनावरी लोकांनी इब्राहिम या जगी नसताना त्याच्या १७ व्या वाढदिवशी स्वेच्छेने रक्तदान केले. वयाच्या सोळाव्या वर्षी एक फाउंडेशन स्थापन करून इब्राहिमने २० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्याने २९ जुलै २०२१ पर्यंत त्याने १८ हजार झाडे लावलीही. मात्र, ३१ ऑगस्टला त्याचे प्राणपाखरू उडाल्याने तो संकल्प तडीस नेण्याचा वसा त्याचा भाऊ ताहिर पठाणने घेतला. पूर्णही केला. त्या दोन हजार झाडांचे संवर्धन ताहिर करणार आहे.
ग्रामगीतेचे उर्दू भाषेत रुपांतर
इब्राहिमची आई बुशरा पठाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता या लोकग्रंथाचे उर्दू भाषेमध्ये भाषांतर केले आहे. त्यांच्या डोक्यातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे श्लोक रमले आहेत. इब्राहिम वयाच्या १३व्या वर्षी स्काऊट शिबिरासाठी अमेरिकेत जाऊन आल्याची आठवण बुशरा यांनी जागविली.