शहर स्वच्छतेवर ‘फ्लार्इंग स्क्वॉड’चा वॉच !
By admin | Published: March 20, 2017 12:06 AM2017-03-20T00:06:51+5:302017-03-20T00:06:51+5:30
आठ लाख लोकसंख्येचा अमरावती महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर ४३ पेक्षा अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांचा कटाक्ष राहणार आहे.
खळबळ : तपासणी पथकात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश
अमरावती : आठ लाख लोकसंख्येचा अमरावती महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर ४३ पेक्षा अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांचा कटाक्ष राहणार आहे. १४ मार्चला महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या वादळी बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात दैनंदिन साफसफाईच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचा निपटारा व कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता मनपा अधिकाऱ्यांचे तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. आयुक्त हेमंत पवार याने यासंदर्भात १५ मार्चला आदेश काढला असून स्वच्छतेच्या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा गर्भीत इशारा दिला आहे. जुन्या प्रभागातून ४३ प्रभागांतील साफसफाईच्या तपासणीकरिता दोन्ही उपायुक्तांसह कंत्राटी शहर अभियंता सहायक आयुक्त, अभियंते, शाखा अभियंते, कार्यकारी अभियंता, क्रीडाधिकारी, शिक्षणाधिकारी, पशुशल्यचिकित्सक, मुख्य लेखापरीक्षक, मुख्यलेखाधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडेही तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या तपासणी पथकाकडे स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगारांचे हजेरीची ठिकाणासह तपासणी अहवालाचा नमुना देण्यात आला आहे. एकूण १७ मुद्यांवर या तपासणी पथकाला दैनंदिन साफसफाईवर नजर ठेवायची आहे. तथा कंत्राटदाराच्या नावासह तपासणी अहवाल आयुक्तांकडे सोपवायचा आहे. या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोनवेळा सकाळी ६ वाजेपासून प्रभागातील कामगारांची हजेरीबाबत तपासणी करावी व दैनंदिन साफसफाईच्या कामाबाबत पाहणी करावी. गैरहजर असलेल्या मनपा तसेच कंत्राटदारांचे कामगारांबाबत अहवाल संबंधित झोन कार्यालयाला पाठवावा, असे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत. (प्रतिनिधी)
अशी होईल कारवाई
कंत्राटदारांचे कामगार, मनपाच्या कामगारांची गैरहजेरी, कंत्राटदाराचे ५०० रुपयांप्रमाणे गैरहजर कामगार कपात, आवश्यक साहित्य नसल्यास २०० रुपयांप्रमाणे कपात, कन्टेनर बाजूला कचरा पडल्यास प्रतिकंटेनर १०० रु. कपात, गणवेश नसल्यास २०० रु. प्रति कामगार कपात, कंत्राटदाराकडे हजेरी रजिस्टर नसल्यास १०० रु. कपात, सुपरवायझर नसल्यास ५०० रुपये कपात, हायड्रोलिक आॅटो नसल्यास ५०० रुपये प्रति आॅटो कपात अशी तरतूद आहे.
फौजदारी आणि ब्लॅकलिस्ट
१४ मार्चला शहर स्वच्छतेबाबत महापौर आणि भाजप नगरसेवकांची बैठक वादळी ठरली. यात स्वच्छतेत हयगय करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी करण्याचे निर्देश देण्यात आले. तथा कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांचे तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
या बाबीची होईल तपासणी
कामगारांची उपस्थिती, आवश्यक साहित्य, घंटीकटले, हजेरी रजिस्टर, सुपरवायझर, गणवेश, हातगाड्या, डायरी, स्वास्थनिरीक्षक अािण बिप्युन आहे की नाही ही तपासणी व नागरिकांची स्वाक्षरी.