उत्पन्नवाढीसह विशेष निधी आणण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:55 PM2018-03-13T22:55:26+5:302018-03-13T22:55:26+5:30
महापालिकेची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नवाढीच्या योजना प्रत्यक्षात साकाराव्या लागतील, मालमत्तांचे सर्वेक्षण व नव्याने करनिर्धारण झाल्यास उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नवाढीच्या योजना प्रत्यक्षात साकाराव्या लागतील, मालमत्तांचे सर्वेक्षण व नव्याने करनिर्धारण झाल्यास उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. याशिवाय महापालिकेवरील दायित्व कमी करण्यासाठी विशेष निधी खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त स्थायी समिती सभापती विवेक कलोती यांनी मंगळवारी दिली.
९ मार्चला बिनविरोध निवड झाल्यानंतर कलोती यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी अर्थसंकल्प वस्तुनिष्ठ व परिस्थितीनुरुप ठेवण्यावर आपला भर राहील. डीपीसीतून मिळालेल्या ७.३६ कोटी रुपये निधीतून सुचविलेल्या कामांसाठी निविदा प्रक्रिया आरंभण्यात आली असून, त्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असफल्याचे कलोती म्हणाले. महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, मावळते स्थायी समिती सभापती तुषार भारतिय, सभागृहनेता सुनील काळे, शिक्षण सभापती चेतन गावंडे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रकाश बन्सोड, अजय गोंडाणे, विजय वानखडे, सुरेखा लुंगारे आदी पदाधिकारी व नगरसेवकांनी कलोती यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे व महेश देशमुख, मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, डॉ.सीमा नैताम, नगरसचिव मदन तांबेकर प्रमोद येवतीकर आदी अधिकारी कर्मचाºयांनी त्यांचे स्वागत केले.