चाऱ्याचा दुष्काळ, १० लाख पशुधनाची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:10 AM2019-06-24T01:10:52+5:302019-06-24T01:11:11+5:30
जिल्ह्यात उत्पादित चारा आता संपला. त्यामुळे १० लाख पशुधन अजून एक महिना जगवावे कसे, हा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे, बाजारात पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असल्याने आर्थिक संकटातील शेतकऱ्यांसमोर खरिपाच्या तोंडावर नवे संकट निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात उत्पादित चारा आता संपला. त्यामुळे १० लाख पशुधन अजून एक महिना जगवावे कसे, हा गंभीर प्रश्न पशुपालकांसमोर उपस्थित झालेला आहे. विशेष म्हणजे, बाजारात पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असल्याने आर्थिक संकटातील शेतकऱ्यांसमोर खरिपाच्या तोंडावर नवे संकट निर्माण झाले आहे. कृषिमंत्री अनिल बोंडे याकडे लक्ष देणार का, असा पशुपालकांचा सवाल आहे.
वैरण उत्पादनासंदर्भात शासनाच्या विविध योजनांद्वारे निर्माण झालेला हिरवा चारादेखील जून महिन्यात संपुष्टात आला आहे. शेतकºयांकडे बेगमी केलेले गव्हाचे, सोयाबीनचे अन् तुरीचे कुटार केव्हाच संपले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकही चारा छावणी नाही. आधीच पाणीटंचाईमुळे पशुपालक त्रस्त असताना वैरणटंचाईचा प्रश्न समोर आला आहे. बाजारात कुट्टीचे दर १५ रुपये किलो आहे. ढेप ३२ रुपये, तर धान्याची चुरीदेखील २५ ते ३० रुपये किलो या दराने विकली जात आहे. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वाढीव दरातील पशुखाद्य घेण्याची त्याची आर्थिक कुवत नाही. गोवंश कायद्यामुळे जनावरे विकली जात नाहीत. त्यामुळे शेतकºयांसमोर अनेक संकट एकाच वेळी आलेली आहेत.
जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार मोठी जनावरे ५ लाख १२ हजार ६०, लहान जनावरे १ लाख ३८ हजार १६८ व शेळी-मेंढी ३ लाख ५३ हजार ३२७ असे एकूण १० लाख ३ हजार ३२७ पशुधन आहेत. जिल्ह्यात मागील हंगामात १० लाख १ हजार ७३५ मेट्रिक टन एकुण उत्पादीत चारा आहे. या सर्व पशुधनाला प्रतिमहिना १ लाख ५ हजार २४२ मेट्रिक टन चारा आहे. हा चार जिल्ह्यातील एकूण पशुधनाला सरासरी १० महिने पुरेल एवढाच असल्याने जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून जनावरांची उपासमार सुरू होणार असल्याचे दाहक वास्तव आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी उत्पादित चाºयामुळे चांदूरबाजार व धारणी तालुक्याची स्थिती चांगली आहे. चांदूर रेल्वे, धामणगाव व दर्यापूर तालुक्यात जेमतेम स्थिती आहे. त्याच्या तुलनेत अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चिखलदरा, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा व वरूड तालुक्यात वैरणाची मे महिन्यापासूनच वानवा आहे. यासाठी शासनाने वैरण विकास , गाळपेर क्षेत्र, यासारख्या अनेक योजनांद्वारे पशुपालकांना वैरण बियाणे उपलब्ध करून हिरवा चारा निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र, हा चारा एक-दोन महिन्यात संपल्याने पशुधनाची उपासमार हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर तातडीच्या उपायांची आवश्यकता आहे.