चिखलदऱ्यात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:09 PM2019-03-17T22:09:04+5:302019-03-17T22:10:13+5:30
उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नऊ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. कोरड्या विहिरीत एकापाठोपाठ एक बकेट टाकण्यासोबत आदिवासींची नदी-नाल्यात भटकंती सुरू झाली आहे.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नऊ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. कोरड्या विहिरीत एकापाठोपाठ एक बकेट टाकण्यासोबत आदिवासींची नदी-नाल्यात भटकंती सुरू झाली आहे.
चिखलदरा तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या असल्या तरी सखल उंच पठारावर वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही उन्हाळ्यात टँकरनेच पाणीपुरवठा केला जात असल्याचे वास्तव आहे.
चिखलदरा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी साठवून ठेवण्यासाठी आदिवासींकडे मुबलक भांडी नाहीत. साठविलेले पाणी संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होते. अशा स्थितीत पठारी भागातून पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पायीच डोक्यावर भांडी घेऊन ये-जा करावी असल्याने मोठी कसरत होत आहे. तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये असलेले हातपंप जलपातळी खाली गेल्याने नादुरुस्त व कोरडे पडले आहेत. उन्हाळ्यात हातपंप दुरुस्तीपथक वाढविण्याची मागणी आदिवासींनी केली आहे. दुसरीकडे सार्वजनिक व पाणीपुरवठा करणाºया अन्य विहिरींचे खोलीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकडे यांनी केली आहे.
आदिवासी गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया विहिरींच्या खोलीकरणासाठी ब्लास्टिंगची परवानगी आवश्यक आहे. पाणी जीवनाश्यक असल्याने प्रशासनाने ती परवानगी देण्यासह मुख्यालयी न राहणाºया ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली आहे.
विहिरी अधिग्रहित, कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात
चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तत्काळ पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत तहसील कार्यालयाला व तेथून पुढे धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या गावांमध्ये पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या गावांचा समावेश आहे. पाणीपुरवठा टँकरने करण्यासाठी काही गावातून विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
नऊ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आले आहे.
- मनीष गायकवाड,
तहसीलदार, चिखलदरा
पाण्याची पातळी खोल गेल्याने ब्लास्टिंगने विहिरीचे खोलीकरण करण्यात यावे, ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश असताना गैरहजर राहणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.
- सुनंदा काकड,
सदस्य, जिल्हा परिषद