जिल्ह्यातील 'या' इन्फ्लूएन्सर्सचे फॉलोअर्स अन कमाई लाखांत !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:31 PM2024-08-27T12:31:22+5:302024-08-27T12:33:03+5:30
नेटकऱ्यांची कंटेंटला पसंती : नवनवीन विषयाला घातला जातो हात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल मीडियावर नेहमी असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियाची क्रेझ जशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याचप्रमाणे इन्फ्लूएन्सर्सची संख्यादेखील कमालीची वाढली आहे. सोशल मीडिया पोस्ट्स, यूट्यूब शॉट्स, इन्स्टा रील्स अशी विविध माध्यमे वापरून इन्फ्लूएन्सर्स कंटेंट शेअर करत असतात.
अमरावतीच्या राठीनगरातला शशांक उडाखे, परतवाड्यालगतच्या हनवतखेड्याचा विशाल पिसाट, मोर्शी तालुक्यातील बिपीन माहोरे, त्याची सहकारी तन्वी काकड, तिवसा तालुक्यातील विजय खंडारे, अमरावतीतील 'मग म्हणाण सांगितलं नाही' फेम प्रज्ञा राऊत, कचकच कांदा कापताना' फेम रश्मी व सारंग सोनवणे, अश्विन वाकोडे, रवि वानखडे या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचा लाखोंचा फॅन फॉलोइंग आहे. जबरदस्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लूएन्सर्सचा उपयोग जाहिरात किंवा प्रमोशनसाठी होतो. त्या मोबदल्यात किमान पाच हजार ते एक लाखापर्यंत आर्थिक फायदा होऊ शकतो. फॉलोअर्सची संख्या, हिट / व्ह्यूज, अशा गोष्टी इन्फ्लूएन्सर्सना 'पेड पार्टनरशीप' मिळवून देतात. त्यावरच त्यांची आर्थिक घडी बसते. ही मंडळी समाजातील विविध मुद्द्यांवर वेगळी अशी ठाम बाजूही मांडतात. मुख्य म्हणजे ही मंडळी सामाजिक मुद्द्यांवर भूमिका घेतात.
नवीन इन्फ्लूएंसरना सल्ला काय?
तुमच्यातील अंगभूत कला या प्लॅटफॉर्मवर वापरा. दुसऱ्याचे बघून या क्षेत्रात येऊ नका, कुणाला कॉपी करू नका, सोशल प्लॅटफॉर्मवरदेखील स्पर्धा आहे. स्ट्रगल करून यात यश मिळवावे लागते. येथेही कुठलाही शॉर्टकट नसल्याचे विपीन सांगतो. तर, ज्या विषयातील कंटेंट द्यायचा आहे; त्याची माहिती रंजक पद्धतीने मांडता यायला हवी. ते व्हिज्युअलीही देखणे हवे. सध्याच्या ट्रेंड्सची माहिती हवी. प्रेक्षकांना काय वाचायला, ऐकायला, बघायला आवडते याचा अभ्यास हवा, कंटेट देखील नवा हवा, असे मत जिल्ह्यातील टॉप असलेला शशांक,विशाल व त्याचे सहकारी इन्फ्लूएन्सर्स व्यक्त करतात. जर तुम्हाला लोकप्रिय व्हायचे असेल आणि पैसे कमावायचे असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. सुरुवातीला बँड प्रमोशन आणि कंटेट राइटिंग करून या कामाला नंतर एक फुलटाइम प्रोफेशन बनवू शकता.
इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम फेसबुक युट्युब
शशांक उडाखे, अमरावती ५,५०,००० १,५०,००० ३,२५,०००
विशाल पिसाट, हनवतखेडा ३,८०,००० २,४२,००० ५५,०००
बिपीन माहोरे, शिरजगाव २,८०,००० ९०,००० १,८०,०००
निखळ मनोरंजन करणारा शशांक उडाखे
एमई सिव्हिल असलेला शशांक उडाखे हा त्याच्या शॉर्ट व्हिडीओतून निखळ मनोरंजन करतो. तो राज्यातील टॉप टेनमध्ये आहे. जिल्हयात देखील तो टॉपवर आहे.
गावपण दाखविणारा विशाल पिसाट
परतवाड्यालगतच्या हनवतखेडयाचा विशाल हा तर रोजच्या जगण्यातील गोष्टी हेरतो. बेरोजगारांपासून गवंडीपासून हेअर सलूनपर्यंतच्या विविध समस्यांवर तो भाष्य करतो.
थोडासा गंभीर, सदोदित हसरा बिपीन
पॉलिटेक्निक झालेला २४ वर्षीय बिपीन माहोरे थोडासा गंभीर मात्र सदोदित हसायला लावणारा इन्फ्लूएन्सर्स आहे. गाव असो वा शहर सर्व करंट इश्यू तो हाताळतो.