संतापले लोकशाहिरांचे अनुयायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:25 PM2018-07-17T23:25:02+5:302018-07-17T23:27:38+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनाच्या ऐन पूर्वपहाटेला लोकशाहिरांच्या पुतळ्यासाठीचे सिमेंट स्तंभ बेमालूमपणे मोडून काढण्यात आल्याने मातंग व बहुजन समाजबांधवांनी अचानक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनाच्या ऐन पूर्वपहाटेला लोकशाहिरांच्या पुतळ्यासाठीचे सिमेंट स्तंभ बेमालूमपणे मोडून काढण्यात आल्याने मातंग व बहुजन समाजबांधवांनी अचानक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आयुक्तालय तसेच वर्दळीच्या गर्ल्स हायस्कूल चौकात दिवसभर तणावाचे वातावरण होते. मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी गर्ल्स हायस्कूलच्या आवारात सिमेंट काँक्रीटचे स्तंभ उभारले गेले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या १८ जुलै रोजी पुण्यतिथीनिमित्त त्याजागी प्रतिमापूजन करण्याचा मानस समाजबांधवांचा होता. सर्व जण त्या तयारीत असताना ते स्थळ उद्ध्वस्त केल्याची वार्ता समाजबांधवांमध्ये मंगळवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने पसरली. मोठ्या संख्येने समाजबांधव कुटुंबीयांसह घटनास्थळी एकत्र आले. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या पुढाकारामुळे हे घडल्याची भावना उपस्थितांची झाली. त्यामुळे ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी घेऊन तो जत्था पोलीस आयुक्तालयावर धडकला. तिनेक तासांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संतप्त मातंग बांधवांशी चर्चा केली. ठाणेदारांचे निलंबन आणि तोडलेले बांधकाम पूर्ववत बांधून देण्याची मागणी करण्यात आली. तसे निवेदनही देण्यात आले.
सीपींचे शांततेचे आवाहन
पुण्यतिथी महोत्सव नेहमीप्रमाणे गर्ल्स हायस्कूल चौकात पार पाडण्याची अनुमती पोलीस आयुक्तांनी दिली. त्यामुळे आंदोलक काहीसे शांत झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे आणि शांतता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी आंदोलकांना दिला. पोलीस आयुक्तांनी स्थिती संवेदनशीलपणे हाताळल्याने आंदोलकांनीही शांततेची भूमिका घेतली. मानवी हक्क अभियानाचे कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, लहुजी शक्ती सेनेचे रुपेश खडसे, भीम आर्मीचे मनीष साठे, बंटी रामटेके, माजी नगरसेवक सुदाम बोरकर, प्रभाकर वाळसे, सुरेश स्वर्गे, गणेशदास गायकवाड, राजा हातागडे, अनिल सोनटक्के, सागर कलाने, पंकज जाधव, गौरव गवळी, कैलास स्वर्गे, दिलीप आमटेंसह शेकडो बांधव उपस्थित होते.
पोलिसांची तारांबळ
गर्ल्स हायस्कूल चौकात शेकडोंच्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. संतप्त समाजबांधवांनी थेट पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. कमांडोज्च्या तगड्या बंदोबस्ताने त्यांना तेथे रोखले. नंतर काहींना आत प्रवेश देण्यात आला. समाजबांधवांनी पुन्हा गर्ल्स हायस्कूल चौकात एकत्र येऊन ठिय्या दिला. यात महिला, मुलांचीही संख्या उल्लेखनीय होती. दोन्ही ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
ठाणेदार मनीष ठाकरे यांनीच या प्रकरणात अनावश्यक घाई केली. जागा कुणाच्या मालकीची आहे, याची खातरजमा त्यांनी केली नाही. समाजबांधवांना विश्वासात घेतले नाही. त्यांना निलंबित करेपर्यंत लढा सुरू राहील.
- रूपेश खडसे
विदर्भाध्यक्ष, लहुजी सेना
पुतळ्यासाठीचे कॉलम मोडल्याने आमच्या भावना दुखावल्या. पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाणेदारांच्या चौकशीचे आश्वासन दिले. बुधवारी गर्ल्स हायस्कूल चौकात पुण्यतिथीसाठी समाजबांधव एकत्र येतील.
- दादासाहेब क्षीरसागर
राज्याध्यक्ष, मानवी हक्क अभियान
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यासंबंधाने निवेदन प्राप्त झाले. शांत राहण्याचे आश्वासन मातंग व बहुजन समाजबांधवांनी दिले आहे. नेहमीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम गर्ल्स हायस्कूल चौकात त्यांना घेता येईल.
- दत्तात्रय मंडलिक
पोलीस आयुक्त.
सदर प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय काहीच न करण्याचे आदेश आहेत. जिल्हा परिषदेचाही जागा हस्तांतरणाचा ठराव नाही. त्यामुळे नियमबाह्य बांधकामाबाबत आम्ही तक्रार दिली.
- मनीषा खत्री
सीईओ, जिल्हा परिषद
गर्ल्स हायस्कूल जागेच्या मालकीसंदर्भात काहीही माहिती नाही. जागेचा सातबारा बघूनच ते स्पष्ट होईल. मध्यंतरी निवासी उपजिल्हाधिकाºयांनीदेखील जागेबाबत विचारणा केली होती.
- एस.बी. खंडागळे
प्रभारी उपसंचालक, शिक्षण विभाग
शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मी कायदेशीर कारवाई केली. सदर प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा 'स्टेटस को' आहे. मोडतोडीशी माझा संबंध नाही.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.