अन्न, प्रशासन विभाग एका कारवाईने काय सिद्ध करणार ?
By admin | Published: April 24, 2016 11:59 PM2016-04-24T23:59:39+5:302016-04-24T23:59:39+5:30
आंबे व केळी पिकविण्यासाठी फळेविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर करताहेत.
अमरावती : आंबे व केळी पिकविण्यासाठी फळेविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर करताहेत. अन्न, प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असतानासुध्दा वर्षभरात अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्बाईड जप्त करून आंबे नष्ट करण्याची एकमेव कारवाई केली. शहरातील १२ लाख लोकांच्या जीविताशी फळेविक्रते दररोज खेळतात. लोकांचा जीव धोक्यात असताना केवळ एखादी कारवाई करून अन्न, प्रशासन विभाग काय सिध्द करणार, असा सवाल जनता उपस्थित करीत आहे.
'लोकमत'ने १२ दिवसांपूर्वी फळविक्रेत्यांनी चालविलेल्या या घातक प्रकाराचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. आंबे तातडीने पिकविण्यासाठी फळविक्रेत्यांकडून ईथेलिन गॅसचा वापरदेखील करण्यात येतो. इथेलिन गॅसच्या वापरावर बंदी नाही. परंतु निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक वापर केला तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. असे असूनही झटपट पैसे कमविण्यासाठी फळेविक्रते लोकांच्या आरोग्यासोबत घातक खेळ करीत आहेत. कॅलशियम कार्बाईडच्या वापरावर मात्र पूर्णत: बंदी असताना धाडसत्र राबविताच फळविक्रेत्यांकडे कार्बाईड कसे काय सापडलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अन्न व प्रशासन विभागाकडे मनुष्यबळाची वानवा असली तरी निकृष्ट दर्जाचे मानवी शरीराला हानीकारक ठरू शकणाऱ्या भेसळयुक्त अन्नाची विक्री रोखून अशा विक्रेत्यांवर कारवाई करायलाच हवी.
हानीकारक पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचीच आहे. असे असताना एकमेव कारवाई करून अधिकारी शांत कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धडक कारवाई अपेक्षित
अमरावती : नागरिकांच्या आरोेग्याशी सुरू असलेल्या खेळाचा पर्दाफाश झाल्यानंतर अन्न, प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी शहरातील आंब्याच्या गोदामांवर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तुर्तास एकच कारवाईवर अन्न, प्रशासन विभाग थांबला आहे. आंबे, केळी पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असेल तर आंब्यांसोबत ही घातक द्रव्ये पोटात गेल्याने घशाचा कॅन्सर, किडनी निकामी होणे, लिव्हर खराब होणे, पोटाचे, तसेच मेंदूचे अनेक आजार, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.