अन्नातून विषबाधा; लागोपाठ तीन भावंडांचा मृत्यू
By Admin | Published: May 11, 2016 12:31 AM2016-05-11T00:31:06+5:302016-05-11T00:31:06+5:30
धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.
बालिकेवर उपचार सुरु : धारणीतील धारणमहू गावातील घटना
अमरावती : धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.
७ मे रोजी ही घटना घडली होती. याच दिवशी उपचारादरम्यान योगेश नामक बालकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तीन गंभीर बालकांवर उपचार सुरू होते. सोमवारी मनीषा नामक मुलीचा तर मंगळवारी सुशीलनेही जगाचा निरोप घेतला. एका बालिकेवर अद्यापही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश रामविलास भिलावेकर (८), सुशील भिलावेकर (७), मनीषा भिलावेकर (१२) अशी मृतांची नावे आहेत तर सावित्री भिलावेकर (१०) हिच्यावर उपचार सुरू आहेत.
धारणमहू येथील रहिवासी भिलावेकर कुटुंबीयांनी ६ मे रोजी रात्री जेवणात भात बनविला होता. आई-वडिलांसह योगेश भिलावेकर, सुशील भिलावेकर, मनीषा भिलावेकर व सावित्री भिलावेकर या चार भावंडांनी तो भात खाल्ला.
आरोग्य अधिकाऱ्याची धारणमहूला भेट
अमरावती : थोडा भात शिल्लक राहिल्यानंतर तो भात दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवला होता. दरम्यान ७ मे रोजी भिलावेकर कुटुंबातील आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले असता तो भात चार भावंडांनी खाल्ला. त्यानंतर त्या चारही भावंडांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, संडास व भोवळ येण्याचा त्रास जाणवला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र, इर्विनला आणतानाच योगेशचा मृत्यू झाला. रविवारी सुशील, मनीषा व सावित्री या तिघांनाही इर्विनमध्ये दाखल करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिघांनाही नागपूरला हलविण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला असून मंगळवारी सुशीलचा देखील मृत्यू झाला. आता भिलावेकर कुटुंबातील एक सदस्य सावित्री हिच्यावर उपचार सुरु आहे. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी धारणमहू गावाला भेट देऊन सर्व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली आहे.
शिळा भात खाल्ल्याने चारही जणांची प्रकृती बिघडली होती. त्यातील बॉटिलिझन जंतूमुळे चारही मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
- नितीन भालेराव,
जिल्हा आरोग्य अधिकारी
शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मात्र, अन्नाचे नमुने मिळाले नसून वरिष्ठांना माहिती दिली.
- मिलिंद देशपांडे,
सहायक आयुक्त (अन्न)