शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:53 PM2023-07-28T13:53:35+5:302023-07-28T13:57:49+5:30

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार, अधीक्षक बेपत्ता

Food poisoning of 34 tribal students of Govt Eklavya School | शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

googlenewsNext

परतवाडा/अचलपूर : चिखलदरा येथे इमारत शिकस्त झाल्यामुळे अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूरनजीक स्थानांतरित शासकीय एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलच्या ३४ विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी पोह्याचा नाष्टा व पाणी प्यायल्यानंतर अचानक मळमळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २४ तास त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. अन्नातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिकच्या नियंत्रणात असलेल्या चिखलदरा येथील सीबीएसई निवासी शाळा वडगाव फत्तेपूर येथे तीन वर्षे अगोदर स्थानांतरित करण्यात आली. एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी पोह्याचा नाष्टा व पाणी घेतल्यानंतर प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. 

अधीक्षक गैरहजर, तडकाफडकी दिले मुख्याध्यापक

आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला ठेवून मुख्याध्यापक आर.बी. मोरे १९ जुलैपासून गैरहजर आहेत. यामुळे गुरुवारी या प्रकारानंतर धारणी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाने तातडीने आर.जी. काळे यांची अमरावती येथून मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली. या शाळेच्या अनेक तक्रारी असताना आतापर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष हा संतापाचा विषय ठरला आहे.

दुर्घटनेच्या चौकशीसाठी आपणास पाठविण्यात आले होते. परंतु, येथील प्रकार पाहता आपली तातडीने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.

- आर.जी. काळे, नवनियुक्त मुख्याध्यापक

अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल असून सर्व विद्यार्थ्यांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

- सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Food poisoning of 34 tribal students of Govt Eklavya School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.