अन्नपदार्थातील घटकांची होणार विज्ञान केंद्रात तपासणी
By admin | Published: October 14, 2014 11:11 PM2014-10-14T23:11:27+5:302014-10-14T23:11:27+5:30
अन्नातील घटकांची तपासणी करणारी कृषी विज्ञान केंद्रावरील देशातील पहिली प्रयोगशाळा दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्रात पूर्णत्वास जात आहे. कृषी मंत्रालयाने याकरिता सुमारे अडीच कोटी
अमरावती : अन्नातील घटकांची तपासणी करणारी कृषी विज्ञान केंद्रावरील देशातील पहिली प्रयोगशाळा दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्रात पूर्णत्वास जात आहे. कृषी मंत्रालयाने याकरिता सुमारे अडीच कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती आहे.
शेतमाल, फळे तसेच अन्न पदार्थात असलेली घटकांची तपासणी करण्याची सुविधा सद्यस्थितीत देशातील कोणत्याच कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध नाही. अन्न पदार्थात नेमक्या कोणत्या रासायनिक घटकांचा उपयोग करण्यात आला आहे, त्यावरून त्या पदार्थाचा खाण्यापिण्यासाठी उपयोग करावा किंवा नाही याविषयी निर्णय घेणे शक्य होते. सांडपाण्याच्या पाण्यावर अनेक ठिकाणी भाजीपाला उत्पादित होते. त्या पाण्यातील अतिरिक्त लोह व इतर घटक त्या भाजीपाल्यामध्ये उतरतात. अशा प्रकारचा आहारदेखील आरोग्यावर परिणाम करणारा ठरतो. त्याकरिता अन्न पदार्थाच्या तपासणीला महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्रद्वारा अन्न पदार्थातील घटकाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेची मागणी करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने त्यास हिरवी झेंडी दिली असून सुमारे अडीच कोटी रूपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. यानुसार प्रयोगशाळेतील आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असून लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. पाण्यातील विविध घटकांची माहितीदेखील येथून करणे शक्य होणार असून अल्पदरात ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या सुविधेमुळे शेतकरी, नागरिकांना अन्न पदार्थातील नमूने तपासण्यासाठी याचा महत्वाचा उपयोग करता येणार आहे. (प्रतिनिधी)