चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

By admin | Published: January 19, 2016 12:09 AM2016-01-19T00:09:05+5:302016-01-19T00:09:05+5:30

मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना ...

Food security in Chandramouli hut | चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

Next

प्रतीक्षा २५ वर्षांची : बच्चू कडूंचे प्रयत्न, पुनर्वसन करणार
नरेंद्र जावरे  परतवाडा
मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ व रेशन कार्ड सारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आ. बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आलेत.
परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर शासकीय जागेवर मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मदारी, मोघ्या या विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांनी बस्तान मांडले आहे. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील ते मूळ रहिवासी असले तरी त्यांना शासकीय सुविधांचा कुठलाच लाभ देण्यात आला नाही. परिणामी जवळपास ६२ कुटुंबातील २०० वर सदस्य शासन योजनेपासून वंचित असल्याचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी या चंद्रमौळी झोपडीत उघड्यावर जीवन कंठणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली.
अन्न सुरक्षेतून धान्य वाटप
शासन रेशनकार्ड धारकांना कमी दरात गहू, तांदूळ, साखर आदी धान्य पुरविते. मात्र, मागील २५ वर्षांपासून उघड्यावर बस्तान मांडलेल्या या कुटुंबांची शासन दप्तरी नोंदच नव्हती. त्यामुळेच ते अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित होते. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी या संपूर्ण कुटुंबांची माहिती मागवून यादी तयार केली. त्यांना सर्वप्रथम अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे आ. कडू यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे रेशनकार्ड बनविण्यात आले. त्यानंतर २ रूपये प्रतिकिलो दराने गहू, तीन रूपये प्रतीकिलो तांदूळप्रमाणे धान्याचा ६२ पैकी १४ कुटुंबांना लाभ देण्यात आला.

मतदानाचा अधिकारही बजावणार!
२५ वर्षांपासून यातील अनेक कुटूंब मतदानापासून वंचित असल्याची बाब उघडकीस येताच त्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, शून्य रकमेवर बँक खाते काढण्यात आले. त्यांना मतदान कार्डचे वितरणही करण्यात आले. आता हे वंचित मतदानाचा हक्कही बजावतील.

मुलांचा शाळेत दाखला
भटक्या समाजातील हे नागरिक गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असात. पाठीवर बिऱ्हाड असल्याने यांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पुढे आली. ही शाळाबाह्य मुले असली तरी त्यांची नावे वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल असून मुले शाळेत न जाता भंगार, प्लास्टिक गोळा करताना आढळतात. या मुलांना आता दररोज शाळेत पाठविण्याची अट घालण्यात आली आहे. अनेकांची नावे नव्याने शाळेत दाखल करण्यात आलीत.

सार्वजनिक नळ, पुनर्वसनाच्या हालचाली
२५ वर्षांपासून मध्यवस्तीतील अंजनगाव स्टॉप परिसरात भटक्यांची वस्ती आहे. त्यांच्या झोेपडीपर्यंत आजवर कुणाचीच नजर गेली नाही. परिणामी वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आ.कडुंच्या प्रयत्नातून त्यांना आता या सुविधा मिळणार आहेत. तुर्तास पालिकेला तहसील प्रशासनाने सार्वजनिक नळ देण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

Web Title: Food security in Chandramouli hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.