रेतीसाठी खड्डा खणताना निघाला मृतदेहाचा पाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:50+5:302021-05-21T04:14:50+5:30
मोर्शी दीड ते दोन महिन्यांपूर्वी खड्ड्यात गाडलेला मृतदेह बाहेर काढण्यात येऊन पुन्हा त्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येऊन त्याच ...
मोर्शी दीड ते दोन महिन्यांपूर्वी खड्ड्यात गाडलेला मृतदेह बाहेर काढण्यात येऊन पुन्हा त्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येऊन त्याच खड्ड्यात तो मृतदेह पुरल्याची घटना मोर्शी लगतच्या मलिमपूर येथे गुरुवारी उघडकीस आली.
मोर्शी लगत असलेल्या मलिमपूर शिवारात नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीत रेती वाहतूक करणाऱ्या एका इसमाने रेतीसाठी खड्डा खोदणे सुरू केले. खड्डा खोल केल्यानंतर त्याला एका मृतदेहाचे पाय दिसून आले. त्यामुळे त्याने तेथून पळ काढला. तो गावात पळत सुटल्याचे पाहून त्या मार्गाने जाणाऱ्या गुराख्यांनी रेती काढणाऱ्या खड्ड्यात बघितले असता त्यांना तो मृतदेह दिसून आल्याने घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनेची माहिती पोलिसांना दिली. मोर्शीचे प्रभारी ठाणेदार तसरे, साहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार, पोलीस उपनिरीक्षक माया वैश्य, पोलीस जमादार राजकुमार डीहिये, मनोज शेंडे, नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी, मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. वानखडे ही टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जमिनीत पुरण्यात आलेला हा मृतदेह बाहेर काढून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले.
शेवटी अंत्यसंस्काराला लागणारे साहित्य बोलावून त्या मृतदेहाचा रीतीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करून पुन्हा तो मृतदेह त्याच खड्ड्यात पुरविण्यात आला. सदर मृतदेह हा एक ते दीड महिन्यापूर्वी जमिनीत गाडला असावा. हा मृतदेह एका महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले.