सातपुड्याच्या पायथ्याशी ‘ते’ शोधतात झरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:05 PM2019-03-29T23:05:47+5:302019-03-29T23:07:06+5:30
तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. मध्यप्रदेश लगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ४० वर्षांत दुष्काळ न पाहिलेल्या गावातील आदिवासी यंदा मात्र विहिरीत झरे शोधत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. मध्यप्रदेश लगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ४० वर्षांत दुष्काळ न पाहिलेल्या गावातील आदिवासी यंदा मात्र विहिरीत झरे शोधत आहेत.
सातपुडा पर्वतरांजीतून निघणाऱ्या नढा नदी, माडू नदी, दमयंती नदी, खडीचा नाला अशा प्रवाहांतून पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावांमध्ये मुबलक पाणी राहत होते. परंतु, यंदा जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे प्रवाहांशेजारी खड्डा खोदून आदिवासी झिऱ्यांतील पाणी शोधत आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
७२ च्या दुष्काळातही पाणी
१९७२ मध्ये महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना सातपुडाच्या पायथ्याशी मुबलक पाणी होते. त्यामुळे अंबाडा, चिंचोली गवळी, निंभी, येरला आदी गावांतील पाळीव पशू या परिसरात आणली होते, अशी आठवण परिसरात राहणार वयोवृद्ध कालू सलक्या यांनी सांगितली.
पशूंना चार महिने आश्रय
१९७२ च्या दुष्काळात पशुपालकांनी येथे आणलेली जनावरे चार महिने वास्तव्यास होती. पाण्याच्या प्रवाहालगतचे आजन, पिवळवेल, मोह, फेफरीची पाने खाऊन ती जगली. परंतु, आज आमच्याच जनावरांना पाणी मिळेनासे झाले असल्याची खंत आदिवासी व्यक्त करीत आहेत.