विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

By admin | Published: June 24, 2017 12:06 AM2017-06-24T00:06:33+5:302017-06-24T00:06:33+5:30

पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे.

Footpath for university degree | विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

Next

मनुष्यबळाचा अभाव : तीन महिन्यांपासून विद्यार्थी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परीक्षा विभागात पदवी देण्यासाठी कर्मचारी नाही, हे मूळ कारण असल्याची सत्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नामुष्कीने विद्यार्थ्यांना पदवीसाठी पायपीट करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागअंतर्गत पदवी वाटप कक्ष आहे. या कक्षातून पदवी दिली जाते. त्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात महाविद्यालयीन विभागातून पदवी वाटप कक्षात बदली झालेले के.बी.पाटील हे अद्यापही पदवी वाटप कक्षात रुजू झाले नाही. त्यामुळे पदवी वाटप प्रक्रिया रेंगाळली आहे. पदवी मिळावी, यासाठी पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी विद्यापीठ गाठतात. मात्र, या कक्षात संबंधित कर्मचारी रुजू झाले नाही, अशी बतावणी करून विद्यार्थ्यांना पदवीविनाच आल्यापावली परतावे लागत आहे. दरदिवसाला ४० ते ५० विद्यार्थी हे पदवी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येतात. परंतु पदवी वाटप कक्ष कायम बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागते.
तीन महिन्यांपासून पदवी वाटप कक्ष बंद असताना ते कसे सुरु करता येईल, याचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे.
आस्थापना विभागाने के.बी. पाटील यांची पदवी वाटप कक्षात बदली केली असेल तर ते तीन महिन्यांपासून का रुजू झाले नाही? याची चौकशी वजा शहानिशा झाली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षा विभागात सुमारे चार हजार पदवी वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.
पदवी वाटपासाठी एक कर्मचारी मिळत नसेल तर चार हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने १० मार्च २०१७ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. यापैकी किती कर्मचारी बदलीच्या जागी रुजू झाले नाही, याचा आढावा कोणीही घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पदवी वाटप केंद्रातील कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर पदवीसाठी कोणी विद्यार्थी आल्यास त्याला अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदवी वाटप केली जात आहे.
- जयंत वडते,
संचालक, परीक्षा मंडळ

Web Title: Footpath for university degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.