आठ वर्षांपासून सुपरला रक्तपेढीची प्रतीक्षा; रुग्णांना रक्ताची गरज
By उज्वल भालेकर | Published: May 14, 2023 08:49 PM2023-05-14T20:49:24+5:302023-05-14T20:49:30+5:30
रुग्णालयातील डायलिसिस, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज.
अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे २०१५ पासून रक्तपेढी मंजूर आहे. परंतु, शासनाच्या भाेंगळ कारभारामुळे अजूनही संबंधित रक्तपेढी सुरू होऊ शकलेली नाही. सुपरमध्ये रोज ४० ते ५० रुग्ण हे डायलिसीस उपचार घेतात. या ठिकाणी विविध शस्त्रक्रियादेखील होत आहेत. त्यामुळे डायलिसिस तसेच शस्त्रक्रियेतील रुग्णांना रक्ताची गरज असते. परंतु, मागील आठ वर्षांपासून रक्तपेढीची फक्त प्रतीक्षा सुरू आहे.
जिल्ह्यात वर्तमान परिस्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एकमेव शासकीय रक्तपेढी कार्यरत आहे. या रक्तपेढीतूनच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही याच रक्तपेढीतून रक्तपुरवठा होतो. परंतु सुपरमध्ये २०१५ मध्येच स्वतंत्र्य रक्तपेढी मंजूर करण्यात आली होती. राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रक्तपेढीला मंजुरी दिल्यानंतर सुपरच्या इमारतीमध्ये रक्तपेढीही तयार करण्यात आली. परंतु मागील आठ वर्षांपासून रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ तसेच यंत्रसामुग्री रग्णालय प्रशासनाला न मिळाल्याने रक्तपेढी सुरू होऊ शकलेली नाही. सुपरमध्ये येणाऱ्या डायलेसीस तसेच विविध शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना असलेली रक्ताची गरज लक्षात घेता, रक्तपेढी तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
सुपरच्या रक्तपेढीसाठी मंजूर वैद्यकीय अधिकारी इर्विनमध्ये
सुपरच्या रक्तपेढीसाठी काही वैद्यकीय अधिकारी तसेच टेक्निशियनची पदे भरण्यात आली होती. परंतु सुपरची रक्तपेढी सुरू न झाल्याने या अधिकाऱ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन येथील रक्तपेढीमध्ये नियुक्ती देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
हाफकीनकडून होणारा पुरवठा रद्द
सुपरच्या रक्तपेढीला मान्यता मिळाल्यानंतर हाफकीनकडून आवश्यक यंत्रसामुग्री ही रुग्णालयाला मिळणार होती. परंतु हाफकीनने यंत्रसामुग्री देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता सुपरच्या रक्तपेढी सुरू करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची मागणी ही डीपीडीसी फंडातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच आरोग्य आयुक्त कार्यालयाकडेदेखील यंत्रसामुग्रीची मागणी करण्यात आली आहे.
सुपरमधील रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळ अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे या संदर्भातील मागणी ही आरोग्य संचालकांकडे करण्यात आली आहे. यंत्रसामुग्री व मनुष्यबळ मिळताच रक्तपेढी सुरू होऊ शकेल. डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी