चोरीच्या भीतीने दागिणे पोलिसांच्या घरी ठेवले, अन् तेथेही घुसले चोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 11:13 PM2022-11-08T23:13:42+5:302022-11-08T23:15:35+5:30
चोराने त्या विवाहितेने ठेवलेले दागिने तर चोरलेच, पुढे त्यांनी त्या पोलीस दाम्पत्याच्या घरातून रोकड, सोने देखील लांबविले. चोरच ते, त्यांना काय, ते दागिने कुणाचे, माहेरवाशिणीचे की पोलिसांचे? तब्बल ५.४२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोराने पोबारा केला. इकडे दाराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. ७ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपण तर बाहेरगावी चाललोय, घरी चोर शिरले, तर काय करायचे, असा विचार करून एका विवाहितेने तिचे दागिने पोलीस असलेल्या दादा-वहिनींकडे ठेवले. पण हाय रे, तेथेही चोराने एन्ट्री घेतली. चोराने त्या विवाहितेने ठेवलेले दागिने तर चोरलेच, पुढे त्यांनी त्या पोलीस दाम्पत्याच्या घरातून रोकड, सोने देखील लांबविले. चोरच ते, त्यांना काय, ते दागिने कुणाचे, माहेरवाशिणीचे की पोलिसांचे? तब्बल ५.४२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोराने पोबारा केला. इकडे दाराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. ७ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला.
घरफोडीची ही घटना महादेवखोरी भागातील राजेंद्रनगर येथे योगेंद्र ओगले यांच्या घरी घडली. योगेंद्र हे मुंबई पोलीस दलात, तर, त्यांची पत्नी तेजस्विनी शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. राजेंद्रनगर येथे तेजस्विनी या सासू वंदना, सासरे देेविदास ओगले व मुलासमवेत राहतात. दरम्यान, योगेंद्र यांचे जावई किरण गडलिंग यांच्या घराचे त्याच परिसरात बांधकाम सुरू आहे. किरण व गौतमी या दाम्पत्याला चांदुरबाजार तालुक्यातील गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या घरातील सुमारे ३.४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओगले दाम्पत्याच्या घरी ठेवले. २३ ऑक्टोबर रोजी गडलिंग दाम्पत्याने ते दागिने वंदना ओगले यांच्याकडे सुपूर्द केले.
अशी घडली घटना : ६ नोव्हेंबर रोजी दुपारी एकला ओगले कुटुंब योगेंद्र यांच्या मित्राच्या मुलाच्या नामकरण विधीसाठी अकोला येथे गेले. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्यासुमारास ते घरी परतले असता, मुख्य दाराचा कुलूपकोंडा तुटलेला दिसून आला; तर दोन्ही बेडरूममधील आलमाऱ्या उघडया दिसल्या. लॉकर तुटलेले दिसले. अधिक पाहणी केली असता, मुलीकडचे व स्वत:च्या घरातील रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे ५ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत तातडीने फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार अनिल कुरळकर व पोलीस निरीक्षक नितीन मगर घटनास्थळी पोहोचले. श्वान व ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी वंदना ओगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
काय नेले चोरांनी : चोराने वंदना ओगलेे यांच्या मुलीच्या तीन पोत, कानातले, अंगठी, लॉकेटसह सोन्याचा गोफ असा सुमारे ३.४२ लाख रुपयांचा १०० ग्रॅम सोन्याचा ऐवज लांबविला, तर वंदना ओगले यांचे सोन्याचे कानातले, सोन्याच्या मण्यांची पोत, लॉकेट, डोरले मणी असे २३ ग्रॅम सोने, दोन तोळे चांदी व १.२० लाख रुपये रोख असा २ लाख ५ हजारांचा ऐवज चोरीला गेला.