दीड हजारांच्या लाभासाठी, तीन हजारांचे बँक खाते! बँकांमध्ये रांगा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 4, 2024 12:12 AM2024-07-04T00:12:09+5:302024-07-04T00:13:29+5:30
‘जनधन’प्रमाणे झीरो बॅलन्सवर खाते का नाही, त्रस्त महिलांचा सवाल
अमरावती : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी बँक खाते आवश्यक असल्याने बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत. गर्दी कमी करण्यासाठी बँकांनी नवा फंडा काढला आहे. खाते उघडण्यासाठी काही बँकांत २५०० तर काही बँकांमध्ये ३००० रुपयांचे डिपॉझिट करण्यात आल्याने बहुतेक महिलांना परत फिरावे लागले. त्यामुळे जनधन योजनेप्रमाणे झीरो बॅलन्सवर खाते का काढत नाही, असा महिलांचा सवाल आहे.
योजनेसाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्रासाठी तलाठी व सेतू केंद्रात महिलांच्या रांगा लागल्या. शिवाय बँकेचे खातेदेखील आवश्यक असल्याने प्रत्येक बँकांमध्ये गर्दी झालेली आहे. यामध्ये शहर व ग्रामीण भागात खाते काढण्यासाठी बँकांनी वेगवेगळे डिपॉझिट ठेवले आहे. शहरात दोन ते तीन हजारांपर्यंत डिपॉझिट भरावे लागत असल्याने दीड हजार रुपयांसाठी तीन हजार भरून बँकेत खाते काढावे लागत असल्याचा उफराटा प्रकार आता समोर आला आहे.