करजगावात जबरी लूट, वृद्धाचा निर्घृण खून, महिला थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:35 PM2023-02-15T15:35:05+5:302023-02-15T15:35:27+5:30

सोने लुटले, वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

Forced robbery in Karajgaon, brutal murder of old man, woman briefly saved | करजगावात जबरी लूट, वृद्धाचा निर्घृण खून, महिला थोडक्यात बचावली

करजगावात जबरी लूट, वृद्धाचा निर्घृण खून, महिला थोडक्यात बचावली

googlenewsNext

वरूड (अमरावती) : गाढ झोपेत असलेल्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील करजगाव गांधीघर येथे घडली. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास घडलेल्या या प्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शंकर सखारामजी अढाऊ (८३, रा. करजगाव गांधीघर ) असे मृताचे नाव आहे. आरोपींनी त्यांच्या घरातून पाच ग्रॅम सोन्याचा दागिना लंपास केला.

पोलिस सूत्रानुसार, शंकर अढाऊ व पत्नी सुलोचना हे दाम्पत्य सोमवारी रात्री जेवण करून झोपी गेले होते. रात्री ११ च्या दरम्यान अज्ञात तिघे तोंडाला कापड बांधून त्यांच्या घरात शिरले. वृद्धेचे तोंड दाबले व तिचे डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकाने वृद्धावर धारदार वस्तूने प्रहार केला. त्यात त्यांचा अंत झाला. वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. कानातले निघत नसल्याने कान कापण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड होताच आरोपी पळून गेले.

माहिती मिळताच बेनोडा ठाणेदार स्वप्नील ठाकरे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्यासह बेनोडा पोलिसांचा ताफा करजगावात दाखल झाला. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ नीलेश पांडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. आरोपींच्या शोधाकरिता श्वान पथक, ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले.

दत्तक मुलगा घराबाहेर

अढाऊ दाम्पत्याचा दत्तक मुलगा विशाल सोमवारी रात्री बाहेर गेला होता. याच वेळी गावात ब्रह्मलीन दस्तगीर महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू असल्याने ग्रामस्थ त्यात व्यस्त होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अढाऊ यांच्या घराकडे धाव घेतली. वृद्धेच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गळ्यातील मंगळसूत्र काढल्यानंतर कानातील दागिने काढण्याकरिता कान कापून काढा, असे ऐकल्यानंतर जिवाच्या आकांताने ओरडल्याने आरोपी पळाल्याचे वृद्धेने म्हटले आहे.

चोरी करण्याच्या उद्देशाने ती घटना घडली असावी. यामध्ये वृद्धाला धारदार वस्तूने मारून ठार करण्यात आले. पाच ग्रॅम सोन्याचा दागिना घेऊन चोर पसार झाले. त्या अज्ञात तीन आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली.

- स्वप्नील ठाकरे, ठाणेदार, बेनोडा

Web Title: Forced robbery in Karajgaon, brutal murder of old man, woman briefly saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.