भूकंपाच्या थरारक स्मृतींचे व्रण कायमच
By admin | Published: April 25, 2016 12:07 AM2016-04-25T00:07:24+5:302016-04-25T00:07:24+5:30
विदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता.
आशिषने अनुभवला विध्वंस, विनाश : सन २०१५ मध्ये हादरले होते नेपाळ
वैभव बाबरेकर अमरावती
विदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता. त्या घटनेला वर्ष लोटले. मात्र, तो भूकंप आणि त्यावेळच्या विनाशाच्या स्मृती आजही आशिष यांच्या मनात ताज्या आहेत.
शहरातील गणेश पेठ येथील रहिवासी आशिष नामदेव बोके यांनी त्यांच्या कंपनीमार्फत विदर्भातील ३० कृषी संचालकांना नेपाळ येथे पर्यटनासाठी नेले होते. २२ एप्रिल रोजी नागपूर विमानतळावरून हे सर्व लोक दिल्लीकरीता निघाले. दिल्लीतून दुसऱ्या विमानाद्वारे नेपाळच्या काठमांडू शहरात गेले. २३ व २४ एप्रिल रोजी त्यांनी काठमांडू व पोखरा येथील हिमालय पर्वताची विहंगम दृश्ये बघितली. २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सर्वजण ट्रॅव्हल्सने पोखरा आणि काठमांडू मार्गावरील मनोकामना देवीचे मंदिर पाहण्यास निघाले. तेथील ‘रोप वे’मध्ये बसण्याचा आनंद सर्वांनीच लुटला. मात्र, पुढे भूकंपाच्या भयावह स्थितीचा सामना करावा लागेल, अशी पुसटशी कल्पनाही आशिषसह कृषी संचालकांना नव्हती. ‘रोप-वे’मध्ये धम्माल करून सर्व लोक गंतव्याकडे निघाले असतानाच सकाळी ११.५६ वाजताच्या सुमारास अचानक जमीन हादरू लागली. लोक एकमेकांच्या अंगावर कोसळू लागल. काय होतेय हे कोणालाच कळेना. आक्रिताच्या भीतीने लोक जीव मुठीत घेऊन सुरक्षीत जागेचा शोध घेऊ लागले. तेवढ्यात पुन्हा १२.०८ मिनीटांनी भूकंपाचा तीव्र झटका बसला.
तब्बल ८० ते ९० सेकंदांपर्यंत जमीन हादरली. मोठमोठ्या भेगा पडल्यात. पर्वतरागांवरील मोठाल्या दरडी कोसळल्या. त्या दरडींखाली ६० ते ७० जण दबल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याचे सांगताना आशिष आजही शहारतात. भूकंपाची तीव्रता कमी होताच सगळ्यांनी ट्रॅव्हल्सकडे धाव घेतली. मात्र, धास्तीने ट्रॅव्हल्स चालक सुध्दा पळाला होता. त्यामुळे त्यांनी तत्काळ अतिरिक्त पैसे देऊन खासगी बसने ६० किलोमिटर अंतरावरील काठमांडूचा प्रवास सुरु केला. भूकंपानंतर मोबाईल नेटवर्कसुध्दा नव्हते. संपर्क पूर्णपणे तुटला होता.
काठमांडूपर्यंतच्या प्रवासादरम्यान देखील अनेक बसेस दरीत कोसळल्याचे दिसून आले. भोवताल विदारक चित्र होते. इमारती कोसळलेल्या, नागरिकांची धावपळ, ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधताना चाललेला आक्रोश अशी भयावह स्थिती आशिष यांच्यासह विदर्भातील कृषी संचालकांनी अनुभवली. काठमांडूतील हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर देखील पुढील ४८ तास भूकंपाचे हादरे बसण्याचा अंदाज असल्याने हॉटेल चालकाने त्यांना खोलीत जाऊ दिले नाही. हॉटेलचा वीज पुरवठा देखील खंडित झालेला असल्यामुळे चहुकडे काळोख पसरला होता. तेवढ्यात हॉटेलच्या शेजारी असलेली विशाल इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि त्याखाली ३०-३५ जण दबल्याने गोंधळ सुरू झाला. दुसऱ्या दिवशी मायदेशी परतण्याकरिता विमानतळ गाठले असता तेथेही सुमारे १५ हजार प्रवासी दिसून आले. अखेर रात्री १०.२० वाजता वायुसेनेच्या सातव्या विमानात सर्वांना प्रवेश मिळाला. रात्री उशिरा सर्व जण दिल्लीत पोहचले. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, अशीच प्रतिक्रिया सगळ्यांनी व्यक्त केली.