अग्निपंखाचे सात वर्षांनंतर अमरावतीत आगमन, परदेशी पक्षाची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 05:28 PM2019-01-13T17:28:03+5:302019-01-13T17:29:05+5:30
राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले.
- गणेश वासनिक
अमरावती - राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले. लगतच्या सावंगा विठोबा तलावावर पक्षिमित्र शुभम गिरी, प्रशांत निकम व तुषार अंबाडकर यांना अग्निपंखाचे दर्शन झाले. यापूर्वी सन २००४ आणि सन २०११ मध्ये वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांना या पक्ष्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर सात वर्षांनी तो शनिवारी दिसून आला.
रोहित किंवा अग्निपंख अशा नावाने ओळखले जाणारे हे पक्षी हिवाळ्यात विदर्भात दाखल होतात. त्यांना फ्लोमिंगो या इंग्रजी नावानेही ओळखले जाते. यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी तलाव व यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथे अग्निपंखाचे दर्शन झाले होते. राजस्थान, गुजरात व कच्छ ही यांची प्रजनन स्थळे आहेत. ते दलदलीत आपली घरटी बांधून त्यात अंडी घालतात. मात्र, तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागली की, ते नोव्हेंबर महिन्यात पाणी महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडीकिनाºयांवर येतात. रोहित पक्ष्यांच्या जगात एकूण सहा प्रजाती आहेत. त्यातील ग्रेटर फ्लेमिंगो नावाच्या प्रजातीचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे त्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे खास वैशिष्ट्य आहे. या पक्षाची चोच अत्यंत वैशिष्टपूर्ण असून, बाकदार आकारामुळे या पक्ष्याला चिखलातील खाद्य शोधण्यास सोपे जाते.
याव्यतिरिक्त इतरही पक्षी जिल्ह्याच्या विविध तलावांवर दाखल झाले आहेत. मात्र, त्यांची संख्या कमी आहे. एकू ण पक्ष्याच्या स्थलांतरण नोंदींमध्ये प्रजातीनिहाय वाढ झाली असली तरी वैयक्तिक प्रजातींच्या संख्येत मात्र प्रचंंड घट झाली आहे. सध्या तलावावर लिटिल स्टिन्ट, ब्लॅक -टेल, गॉडवीट, ब्लॅक हेडेड गल, नॉर्थर्न शोवेलर, नॉर्थर्न पिनटेल, युरेशियन करलू, वूड सॅन्डपायपर आदी पक्षी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
रोहित पक्ष्यांचे आगमन महत्त्वपूर्ण असून, ते निसर्ग संतुलनाचे प्रतीक आहे. अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान असणाºया रोहित पक्ष्यांना अभय देणे गरजेचे आहे. तलावातील पाण्याची कमी होणारी पातळी चिंतेचा विषय आहे. तसेच तलाव प्लास्टिक मुक्त असणे आवश्यक आहे. अन्यथा पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षण करणे कठीण होईल.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाऊंडेशन, अमरावती