पोहरा-चिरोडीमध्ये १८ तलावांवर विदेशी पाहुणे
By admin | Published: November 8, 2016 12:19 AM2016-11-08T00:19:36+5:302016-11-08T00:19:36+5:30
गुलाबी थंडीची चाहूल लागताच विदेशवारी करण्याकरिता विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सध्या पोहरा, मालखेड, ...
पक्ष्यांची रेलचेल : पक्षीमित्रांसाठी सुवर्ण संधी
पोहरा बंदी : गुलाबी थंडीची चाहूल लागताच विदेशवारी करण्याकरिता विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सध्या पोहरा, मालखेड, तपोवनेश्वर, शेवती, चिरोडी, सावंगा आदी तलावांवर गर्दी केली आहे. या पक्ष्यांमध्ये लद्दाख, आफ्रिका, पश्चिमी आखातातील युरोप व आशिया खंडातील बदक, लालसरी, राजहंस, तुतारी, राखांडी रंगाचे बदक, सिक्रा, किअसेट, चोचींचा पक्षी, लाल शेंडीचा बदक, नदीत तरंगणारे सुरव चक्रावाक, धोबी कौंची आदी पक्ष्यांचा समावेश आहे.
हे विदेशी पक्षी जवळपास दोन ते तीन महिने या क्षेत्रात घालवितात आणि उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्या मातृभूमिच्या दिशेने कूच करतात. त्यांच्या आगमनामुळे सध्या हा जंगल परिसर गजबजला आहे. विविध रंगांचे व विविध जातींचे हे स्थानांतरित विदेशी पक्षी आपल्या जुन्या सवंगड्यांसह मौजमस्ती करताना दिसून येत आहेत. अशाप७्यांची संख्या १०० च्या वर पोहोचल्याची शक्यता आहे.
विविध रंग, विविध प्रजातींचे हे पक्षी येणाऱ्या -जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच थव्या-थव्याने आलेले हे पक्षी वेगवेगलेया ठिकाणी त्यांच्या वसाहती करून आहेत. तीन महिनेपर्यंत हे पक्षी याच परिसरात मुक्कामी राहतील. या पक्ष्यांच्या जलक्रिडाही मनोहारी असल्याने हे पक्षी आकर्षण ठरले आहेत. (वार्ताहर)
या तलावांवर पक्ष्यांची गर्दी
पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात सावंगा, पोहरा, चिरोडी, मालखेड, भिवापूर, कारला, तपोवनेश्वर, शेवती, वडाळी, इंदला, बोडणा, कोंडेश्वर, छत्रीतलाव, माळेगाव, गोविंदपूर, मार्डी, कस्तुरा, घातखेड हे तलाव दिवाळीनंतर विविधरंगी पक्ष्यांनी गजबजले आहेत.