जिल्हा बँकेतील व्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:22+5:302021-07-23T04:10:22+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुमारे ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या संपूर्ण व्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुमारे ३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या संपूर्ण व्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले जाणार आहे. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या एक-दोन दिवसात नागपूरची कुठली संस्था ते ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करेल, यावर शिक्कामोर्तब होईल. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याला संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘फॉरेन्सिक ऑडिट’च्या अहवालानंतर जिल्हा बँकेतील या प्रकरणाचे ‘दूध का दूध...’ होण्याचे संकेत आहेत.
एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करीत असताना ३.३९ कोटी रुपयांची दलाली देण्यात आली. यात बँकेची आर्थिक फसवणूक झाली, अशी तक्रार प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी शहर कोतवालीत दाखल केली होती. त्यावरून बँकेच्या पाच आजी-माजी अधिकारी कर्मचाऱ्यांसह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर महिनाभराने प्रकरणाचे वास्तव उघड करण्यासाठी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा पर्याय समोर आला. त्यानुसार डीडीआरला पत्र देण्यात आले. आर्थिक गुन्ह्यासंदर्भात लेखापरीक्षण करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर ४४ ऑडिटर संस्था पॅनेलवर घेतल्या आहेत. पैकी नागपूरच्या दोनपैकी एक संस्था या प्रकरणाचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करणार आहे.
बीएचआर प्रकरणात झाले ‘फॉरेन्सिक ऑडिट’
बीएचआर सोसायटीमध्ये आर्थिक घोटाळा उघड झाल्यानंतर राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्ह्यात अनेकांचा सहभाग असल्याने हे प्रकरण सीआयडीकडे गेले. यात सीआयडीने ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले असून त्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. त्या मालिकेत अमरावती जिल्हा सहकारी बँकेतील आर्थिक अपहार प्रकरणाचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होत असल्याने नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
‘फॉरेन्सिक ऑडिट’ मध्ये काय?
जिल्हा सहकारी बॅंकेत नेमका अपहार किती, कशाप्रकारे झाला, ठेवीदारांच्या ठेवी, अन्य रक्कम कशी वळविण्यात आली, किती कर्जदारांनी कर्ज घेतले, म्युच्युअल फंडमध्ये नेमकी कशी गुंतवणूक करण्यात आली, त्या संपूर्ण व्यवहाराच्या नोंदी तपासल्या जातील. यात बँकेला नफा किती व तोटा किती झाला, ब्रोकरेज दिले तर नेमका कसे, या सर्व बाबींची खातरजमा करण्यासाठी ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केले जाणार आहे. या संपूर्ण आर्थिक अनियमिततेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी न्यायवैद्यक आंतरलेखापरीक्षण करून घेतले जाणार आहे.
कोट
जिल्हा बँकेतील प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी संपूर्ण व्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्यात यावे, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांना दिले. नागपूरच्या दोन पॅनेलाईज्ड संस्थांची नावे त्यांनी कळविली. एक दोन दिवसांत संस्था अंतिम होईल.
- शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा