‘फॉरेन्सिक ऑडिट’मधून उलगडणार गुंतवणुकीचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:43+5:302021-09-07T04:16:43+5:30

जिल्हा बँकेतील आर्थिक अनियमितता : सहकार क्षेत्रातील धुरिणांचे लागले लक्ष प्रदीप भाकरे अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ ...

The forensic audit will reveal the investment figure | ‘फॉरेन्सिक ऑडिट’मधून उलगडणार गुंतवणुकीचा आकडा

‘फॉरेन्सिक ऑडिट’मधून उलगडणार गुंतवणुकीचा आकडा

googlenewsNext

जिल्हा बँकेतील आर्थिक अनियमितता : सहकार क्षेत्रातील धुरिणांचे लागले लक्ष

प्रदीप भाकरे

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच बडे राजकीय असामी उतरल्याने ही निवडणूक ‘हेवी वेट’ ठरली आहे. राजकारण्यांच्या एंट्रीने सहकार क्षेत्रातील ही निवडणूक राजकीय गुद्द्यांची ठरणार आहे. बँकेतील कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा प्रचारातील ‘हॉट टॉपिक’ ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘फॉरेन्सिक ऑडिट’ला वेग आला असून, त्यामधून गुंतवणुकीचा खरा आकडा उलगडणार आहे. गुंतवणुकीचा तो आकडा अधिक असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले होते. त्यामुळे सहकार क्षेत्रातील धुरिणांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’कडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँक व्यवस्थापनाने खासगी कंपनीत गुंतवणूक करीत असताना काही रक्कम थेट गुंतविली, तर काही मध्यस्थांच्या माध्यमातून. बँक आणि कंपनी असा ‘वन टू वन’ व्यवहार असताना ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आली. त्यात ११ जणांनी बँकेची गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून फसवणूक केली, अशी तक्रार दस्तुरखुद्द प्राधिकृत अधिकाऱ्याने दिली. उच्च पातळीवरून राजकीय घडामोडीदेखील घडल्या. अखेर बँकेच्या आजी-माजी अधिकारी कर्मचाऱ्यांसह संबंधित कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक, ब्रोकर अशा एकूण ११ जणांंविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरण आर्थिक अनियमिततेचे असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी प्राथमिक तपासदेखील केला. त्यातून बँकेच्या एकूणच आर्थिक व्यवहाराची स्पष्टता न झाल्याने ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा पर्याय समोर आला.

जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार, नागपूर येथील एक नोंदणीकृत कंपनी निश्चित करण्यात आली. त्या कंपन्यांच्या सीए व अन्य सहकाऱ्यांनी बँकेच्या सन २०१७ ते २०२० या वर्षाच्या व्यवहाराचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण चालविले आहे. त्यातून नेमकी गुंतवणूक, उलाढाल, दलालीची रक्कम व एकूणच अनेक तथ्यांचा उलगडा होणार आहे. तो अहवाल आल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

.......................................

आज तत्कालीन सीईओ ईडीसमोर

३.३९ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर बँकेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंह राठोड यांना ७ सप्टेंबर रोजी ईडीच्या मुंबई स्थित कार्यालयात हजर राहावयाचे आहे. २८ ऑगस्ट रोजी तसा समन्स ईडीने राठोड यांना बजावला आहे. ते हजर होतात, की कसे, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

//////////

कोट

नागपूर स्थित संबंधित ऑडिटर संस्थेने जिल्हा बॅंकेच्या व्यवहाराचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण सुरू केले आहे. ते हाती आल्यानंतर अनेक मुद्यांचा उलगडा होऊ शकेल.

- शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: The forensic audit will reveal the investment figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.