बनावट स्वाक्षरीप्रकरणी अखेर फौजदारी
By admin | Published: February 3, 2017 12:12 AM2017-02-03T00:12:53+5:302017-02-03T00:12:53+5:30
प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी
मुहूर्त सापडला : स्वच्छता देयकांमधील अनियमितता
अमरावती : प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी महापालिकेकडून बुधवार १ फेब्रुवारीला अखेर फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर संबंधिताविरूद्ध पोलिसांकडून फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार असल्याचेही शेटे म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी फौजदारी कारवाईचे निर्देश शेटे यांनी सोमवार २३ जानेवारीला दिले होते. त्यानंतर तब्बल १० दिवसांनी स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचा मुहूर्त सापडला.
बडनेरा शहरातील दोन प्रभागातील साफसफाईच्या देयकावर स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. ‘ती’बनावट स्वाक्षरी कुणाची, हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. ‘बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे बिल’ या शीर्षकाने साफसफाई देयकामधील ही अनियमितता ‘लोकमत’ने रविवार २२ जानेवारीच्या अंकात उघड केली.
त्याअनुषंगाने सोमवार २३ ला आयुक्त हेमंत पवार यांनी अतिरिक्त आयुक्तांकडून याबाबत माहिती घेतली तथा चौकशीच्या अनुषंगाने काही सूचना केल्यात. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी त्या देयकावरील बनावट स्वाक्षरी कुणाची, हे शोधण्यासाठी थेट फौजदारी तक्रार नोंदविण्याचा पवित्रा घेतला. या पवित्र्यामुळे संबंधित घटकांचे धाबे दणाणले होते. मात्र, मध्यंतरी हे प्रकरण मुळापासून दडपण्याचे प्रयत्न करण्यात आले. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही वाढल्या होत्या. उगाच फौजदारी कारवाई केली तर ‘चेन’ब्रेक होईल, असा युक्तीवाद करण्यात आला. आयुक्तांकडे विशिष्ट व्यक्तींकडून रदबदलीसुद्धा करण्यात आली. मात्र, त्यानंतर ‘लोकमत’ने ‘एफआयआरला बे्रक’असे वृत्त प्रकाशित केल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामुळे १० दिवसांनंतर का होईना, बनावट स्वाक्षरी प्रकरणात अरूण तिजारे यांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध शहर कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली.(शहर प्रतिनिधी)
महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत. कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ्य निरीक्षकांकडून देयकांबाबत अहवाल सादर केला जातो. विविध स्तरावर त्या देयकांची तपासणी केल्यानंतर देयके अदा केली जातात. यातील चार देयकांमध्ये बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. (प्रतिनिधी)
असे होते प्रकरण
बडनेऱ्यातील प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथिल बहिरमबाबा संस्था आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवारबाजार येथील मरिमाता बचतगट या संस्थेचे माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांची चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती.
चौकशी व्हायलाच हवी
स्वास्थ अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरीने साफसफाईची देयके अतिरिक्त आयुक्तांकडे येणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. साफसफाई देयकांवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, काही नागरी वस्तींचा अपवाद वगळता स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्यामुळे यापूर्वी असे काही प्रकार घडलेत का, यादिशेने विभागीय चौकशी होणे गरजेचे आहे.