वनविभागाच्या चौकशी समितीचा हरिसाल येथे ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:47+5:302021-04-13T04:12:47+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल ...
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी. साईप्रकाश यांच्या पुढाकाराने वनविभागातंर्गत नऊ सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती गत दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर असून, हरिसाल येथील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांचे बयाण नोंदविले आहे.
११ व १२ एप्रिल असे दोन दिवस या समितीने दौरा निश्चित केला आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येशी निगडित व्यक्तींशी संवाद साधून या समितीने मत नोंदविले आहे. हरिसाल वनपरिक्षेत्रात आतापर्यंत नेमके काय झाले, याबाबतचा घटनाक्रम आणि वास्तव ही समिती १६ मुद्दे विचारात घेऊन चौकशी करीत आहेत. दरम्यान, रविवारी या समितीने दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांना अमरावती येथील वनविभागाच्या विश्रामगृहात बोलावले आणि त्यांचे मत जाणून घेतले. दीपाली यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारी कारणमीमांसा, वरिष्ठांबाबत मत नोंदविण्यात आले. त्यानंतर या समितीने परतवाडा होत पुढे हरिसाल गाठले. सोमवारी हरिसाल वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांसोबत दीपाली चव्हाण यांच्यासंदर्भात चर्चा करून बयाण नोंदविले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याची कार्यशैली आणि कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वागणूक यावर समितीचा फोकस होता. दीपाली यांना डीएफओ विनोद शिवकुमार याच्याकडून मिळणारी अमानवीय वागणूक, कामात हस्तक्षेप, शिवीगाळ किंवा अपमान करणारी घटना यासंदर्भात वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या वर्तणुकीबाबत दीपाली यांनी वनपाल, वनरक्षक अथवा वनमजुरांशी कधीतरी चर्चा केली का? याबाबत मते जाणून घेण्यात आले आहेत.
हरिसाल येथे वनकर्मचाऱ्यांशी चर्चावजा बयाण नोंदविताना समितीचे प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान) एम. के. राव, सहप्रमुख अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, सदस्य म्हणून वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या विभागीय वनाधिकारी पियूषा जगताप, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ विजया ठाकरे (कोकाटे), सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आदींचा समावेश आहे.
०००००००००००००