चांदूर रेल्वे रेंजमध्ये जंगलात आग
By Admin | Published: April 27, 2017 12:13 AM2017-04-27T00:13:52+5:302017-04-27T00:13:52+5:30
चांदूररेल्वे रेंजअंतर्गत येणाऱ्या कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये बुधवारी अचानक जंगलांना आग लागल्याने वनविभागाचे नुकसान झाले आहे.
वन्यप्राण्यांचे नुकसान नाही : कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये नुकसान
पोहराबंदी : चांदूररेल्वे रेंजअंतर्गत येणाऱ्या कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये बुधवारी अचानक जंगलांना आग लागल्याने वनविभागाचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हे विशेष.
हल्ली जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी पोहरा, वडाळी जंगलात आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान झाले आहे. परंतु बुधवारी दुपारी १२ वाजता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात आग लागल्याने वनाधिकारी हतबल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने मार्गदर्शन घेण्यात आले. आग विझविताना अत्याधुनिक साहित्य, साधन सामग्रीचा वापर करण्यात आला. १२ वाजता सुरु झालेली आग दुपारी ४ वाजता आटोक्यात आली. आग नियंत्रणात आणताना वनकर्मचाऱ्यांना समस्यांच्या सामना करावा लागला. अद्ययावत बोलेरो मशीनद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत कोणत्याही वन्यजीवांची हानी झाली नाही, अशी माहिती आहे. चांदूर रेल्वेचे आरएफओ अनंत गावंडे हे आगीवर नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर सतत संपर्क ठेवून होते. वनरक्षक सतीश नाईक, हिवराळे, पवार, कथलकर, बगळे, कांबळे, वनमजूर बनसोड आदींनी आग विझविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.