मेळघाटात अस्वलाच्या हल्ल्यात वनमजूर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:57+5:302021-08-18T04:18:57+5:30
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वनविभागांतर्गत येणाऱ्या पोपटखेड परिसरात अस्वलाने हल्ला करून सोमवारी एका वनमजुराला गंभीर जखमी केले. ...
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वनविभागांतर्गत येणाऱ्या पोपटखेड परिसरात अस्वलाने हल्ला करून सोमवारी एका वनमजुराला गंभीर जखमी केले. त्याने प्रतिकार करून सहकाऱ्याचे प्राण वाचविले.
सोमवारी दुपारी १२ च्या दरम्यान वनमजूर मलकापूर बिट परिसरात गस्तीवर असताना एका अस्वलाने हल्ला चढविला. यामध्ये रामभाऊ भिकाजी सुरत्ने (३८, रा. पोपटखेड) हे गंभीर जखमी झाले. मलकापूर बीटमधील लक्कडदेव परिसरात राम राजेंद्र नरवास व रामभाऊ सुरत्ने हे जंगल गस्तीवर असताना अचानक दोन अस्वल समोर आले. त्यातील एका अस्वलाने रामभाऊ यांच्यावर हल्ला चढवला. रामभाऊने अस्वलीचा हिकमतीने प्रतिकार करीत जबडा दोन्ही हातांनी दाबून ठेवला व जोरजोरात आरडाओरड केली. अस्वलाने पळ काढल्याने रामभाऊंनी स्वतःचा व सहकारी कर्मचाऱ्याचा जीव वाचवला. त्यांच्यावर अकोट ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी जी.पी. गायकवाड, आर.एम. बिरजदार, विकास मोरे, पवार, पाडुरंग तायडे, प्रकाश डाखोरे, बापूराव तायडे यांनी जखमीला उपचारार्थ दाखल केले.