मेळघाटच्या जंगलात ठिकठिकाणी वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:50+5:302021-04-01T04:13:50+5:30
फोटो - ३१ एस वणवा परतवाडा : मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसुरक्षित जंगलात ठिकाणी वणवा पेटला असून, वनकर्मचाऱ्यांच्या ...
फोटो - ३१ एस वणवा
परतवाडा : मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसुरक्षित जंगलात ठिकाणी वणवा पेटला असून, वनकर्मचाऱ्यांच्या दिमतीला आदिवासीही जंगल वाचवा मोहिमेत सरसावले आहेत. मेळघाट वन्यजीव विभागाच्या शिवापाणी खैरकुंडी जंगलात तीन दिवसांपासून आग धुमसत आहे.
उन्हाळा लागताच मेळघाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात वणवा पेटून शेकडो हेक्टर जंगलाची राखरांगोळी होते. राज्यभरातील वनविभागातील कर्मचारी, अधिकारी हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या न्यायासाठी विविध मागण्या करीत आंदोलने करीत असताना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी जंगलाचे संरक्षण करून या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे
रविवारी सायंकाळी सिपना वन्यजीव विभागातील बोराट्याखेडा गावालगत जंगलात आग लागली असता, वनरक्षक, वनमजूर यांना बोराट्याखेडा गावातील अंगारमुक्त जंगल टीमने मदत केली. त्यामुळे आग आटोक्यात आली. रायपूर, हरिसाल गावाच्या सीमेवर हरिसाल वनखंड क्रमांक ६११ मध्ये अंगार आग लागली होती. बोराट्याखेडा गावातील लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही आग विझवण्यास मदत केली.
बॉक्स
विविध ठिकाणी जंगलात आगी
धारणी परिक्षेत्रातील बैरागड बीटमधील वनखंड ६६९ मध्ये वणवा पेटला. यामध्ये बुलूमगव्हाण अंगारमुक्त टीम, धरणी वर्तुळातील अधिकारी व चौरकुंड येथील तुलसी मावस्कर, दीपक धुर्वे, शिवराम जामूनकर, मनोहर राजनेकर, पूरण काळे हे गावकरी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून गेले. पांढरा खडक येथील शिवापाणी खैरकुंडी वनखंड १०४२, १०४६ मध्ये तीन दिवसांपासून आग धुमसत आहे. चौथ्या दिवशी आटोक्यात आल्याची माहिती आहे.